भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसऱ्या कसोटीत यजमानांनी मजबूत पकड बनवली आहे. पहिल्या सामन्यात दोन्ही डावांत शतकी खेळी करणारा रोहित शर्मा आज अपयशी ठरला असला तरी मयांक अग्रवाल आणि चेतेश्वर पुजारा यांनी शतकी भागीदारी करून संघाला मजबूत स्थितीत आणले. या दोघांची भागीदारी आफ्रिकेच्या कागिसो रबाडानं संपुष्टात आणली. पण, मयांकने खिंड लढवताना सलग दुसऱ्या कसोटीत शतकी खेळी केली. या कामगिरीसह त्यानं 10 वर्षांपूर्वीचा विरेंद्र सेहवागच्या विक्रमाशी बरोबरी केली. शिवाय महान फलंदाज सचिन तेंडुलकर, हिटमॅन रोहित शर्मा आणि कॅप्टन विराट कोहली यांना न जमलेला विक्रमही केला. मयांकने थेट सुनील गावस्कर यांच्या पंक्तीत स्थान पटकावलं.
मयांकने 195 चेंडूंत 16 चौकार व 2 षटकारांसह 108 धावा केल्या. पहिल्या कसोटीत मयांकने द्विशतकी खेळी केली होती. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सलग दोन कसोटीत शतक झळकावणारा तो भारताचा दुसरा सलामीवीर ठरला आहे. यापूर्वी 2009-10मध्ये विरेंद्र सेहवागनं 2009-10 च्या मालिकेत आफ्रिकेविरुद्ध 109 आणि 165 धावांची खेळी केली होती. शिवाय आफ्रिकेविरुद्ध सलग दोन कसोटीत शतक करणारा चौथा भारतीय फलंदाज ठरला आहे. यापूर्वी, मोहम्मद अझरुद्दीन ( 1996), विरेंद्र सेहवाग ( 2010), सचिन तेंडुलकर ( 2010) यांनी अशी कामगिरी केली आहे.