India vs South Africa, 2nd Test : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या दुसऱ्या कसोटी सामन्याला उद्यापासून जोहान्सबर्ग येथे सुरूवात होणार आहे. सोमवारपासून सुरू होणाऱ्या या लढतीच्या पूर्वसंध्येला टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड ( Rahul Dravid) यानं पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तर दिली. त्यात एकानं विचारलेल्या कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) पत्रकार परिषदेत का येत नाही, या प्रश्नावर द्रविडनं मजेशीर उत्तर दिलं. भारतानं पहिली कसोटी जिंकून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. त्यात जोहान्सबर्ग येथे भारतीय संघ कसोटीत अपराजित आहे. येथे खेळलेल्या पाच कसोटीत भारतानं दोन विजय मिळवले आहेत, तर तीन अनिर्णित निकाल लागले आहेत.
कर्णधार विराटचे हे फेव्हरिट मैदान आहे आणि दुसऱ्या कसोटीत त्याला अनेक विक्रम मोडण्याची संधी आहेच, शिवाय ७१व्या आंतरराष्ट्रीय शतकाचा दुष्काळही तो इथेच संपवेल असा विश्वास द्रविडनं व्यक्त केला आहे. ''विराटसारख्या खेळाडूसोबत काम करणे म्हणजे आनंदाची गोष्ट. माझ्या नजरेतून पाहाल तर विराट आता चांगल्या टचमध्ये आहे. ज्याप्रकारे तो सराव सत्रात खेळतोय, ते पाहून लवकरच त्याच्याकडून मोठी खेळी होईल, असे मला वाटते. संघाचे मनोबल उंचावण्यासाठी तो सातत्यानं प्रयत्न करतो आणि स्वतःचा आत्मविश्वासही उंचावतोय. भारतीय संघानं जी ऊंची गाठलीय, त्यात विराटचं खूप मोठं योगदान आहे.''
मागील दोन वर्षांत विराटला एकही आंतरराष्ट्रीय शतक झळकावता आलेले नाही. जोहान्सबर्गवर त्यानं दोन कसोटी सामन्यांत ७७.५०च्य सरासरीनं ३१० धावा केल्या आहेत. २०१३मध्ये त्यानं इथं ११९ धावांची खेळी केली होती, तर २०१८मध्ये त्यानं दोन डावांत ९५ धावा केल्या होत्या आणि त्यात एका अर्धशतकाचा समावेश होता.
विराट पत्रकार परिषदेसाठी केव्हा येईल, यावर द्रविड म्हणाला,''केप टाऊन येथे विराट १०० वा कसोटी सामना खेळणार आहे. जर तेव्हा त्यानं पत्रकार परिषदेत हजेरी लावली तर तो मोठा इव्हेंट होईल. तेव्हा पत्रकार त्याला १०० व्या कसोटीबाबत प्रश्न विचारू शकतील. त्याच्यासोबत हा क्षण सेलिब्रेटही करू शकतील. पण, माझ्या माहितीत तो आजच्या पत्रकार परिषदेत नसण्यामागे काहीच कारण नाही.''
Web Title: India vs South Africa, 2nd Test : Rahul Dravid confirms Virat Kohli will attend the press conference ahead of his 100th Test match in his career.
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.