पुणे, भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका : भारताने दक्षिण आफ्रिकेची 8 बाद 162 अशी दयनीय अवस्था केली होती. दक्षिण आफ्रिकेचे नावाजलेले फलंदाज बाद झाले होते. आता भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेला दोनशे धावांमध्ये गुंडाळणार आणि त्यांच्यावर फॉलोऑन लादणार, अशी स्वप्न चाहत्यांना पडायला लागली होती. पण चाहत्यांचे हे स्वप्न हवेतच विरले. कारण दक्षिण आफ्रिकेच्या शेपटाने भारताला चांगलेच झुंजवले. केशव महाराज आणि व्हर्ननॉन फिलँडर यांनी भारताच्या गोलंदाजांचा चांगलेट मेटाकुटीला आणले आणि संघासाठी उपयुक्त धावा जमवल्या. या दोघांच्या शतकी भागीदारीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने तिसऱ्या दिवशी सर्वबाद 275 अशी मजल मारली आहे. अर्धशतकवीर महाराजला बाद करण्यात भारताला अखेरच्या काही षटकांमध्ये यश मिळाले, पण तोपर्यंत त्याने आपले काम चोख निभावले होते.
भारताने तिसऱ्या दिवसाची दमदार सुरुवात केली. फॅफ ड्यू प्लेसिसचा अपवाद वगळता दक्षिण आफ्रिकेच्या एकाही फलंदाजाला चांगली फलंदाजी करता आली नाही. फॅफने 9 चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर 64 धावा केल्या. पण फॅफला आर. अश्विनने बाद करत भारताच्या मार्गातील मोठा अडसर दूर केला. फॅफ बाद झाला तेव्हा दक्षिण आफ्रिकेची 8 बाद 162 अशी अवस्था होती. त्यावेळी भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेवर फॉलोऑन लादण्याची स्वप्न पाहत होता. पण केशव महाराज आणि फिलँडर यांनी भारतीय संघाच्या स्वप्नांना सुरुंग लावला.
फिलँडरपेक्षा यावेळी महाराज चांगलाच आक्रमकपणे फलंदाजी करत होता. भारताचा कर्णधार विराट कोहलीने सर्व गोलंदाज वापरून पाहिले, पण या दोघांनी एकाही गोलंदाजाला बाद करण्याची संधी दिली नाही. त्यामुळे तिसऱ्या दिवसाची सुरुवात भारताने चांगली केली असली तरी दक्षिण आफ्रिकेच्या या दोन तळाच्या फलंदाजांनी दिवस गाजवल्याचे पाहायला मिळाले. केशव महाराजला आर. अश्विनने बाद करत भारताला मोठे यश मिळवून दिले. महाराजने 12 चौकारांच्या जोरावर 72 धावांची खेळी साकारली.
तिसऱ्या कसोटी सामन्यात महेंद्रसिंग धोनी सहभागी होणारभारतीय संघ सध्या दुसरा सामना पुण्यामध्ये खेळत आहेत. यानंतर होणारा तिसरा कसोटी सामना 19 ऑक्टोबरला खेळवण्यात येणार आहे. हा सामना रांची येथे होणार आहे. त्यामुळे आपल्या घरच्या मैदानात धोनीला सहभागी करण्याविषयी चर्चा सुरु झाली आहे.
भारताने पहिल्या सामन्यात दमदार विजय मिळवला. त्यानंतर आता दुसऱ्या सामन्यातही भारतीय संघ विजय मिळवण्याच्या दिशेने कूच करत आहे. त्यामुळे आता तिसऱ्या सामन्यात काय होणार, याची उत्सुकता चाहत्यांना असेल.
धोनीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली आहे. पण मग धोनी तिसऱ्या सामन्यात कसा सहभागी होऊ शकतो, हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. पण घरच्या सामन्यात त्याला संधी द्यावी, असेही तुम्हाला वाटत असेल. जर रांचीला एकदिवसीय किंवा ट्वेन्टी-20 सामना झाला असता तर कदाचित धोनी तुम्हाला मैदानात दिसू शकला असता.
धोनीला या सामन्यात सहभागी होण्यासाठी रांची क्रिकेट संघटनेच्या उपाध्यक्षांनीही विनंती केली आहे. उपाध्यक्ष अजय नाथ यांनी सांगितले की, " आमच्यासाठी या सामन्यात धोनीचा सहभाग फार महत्वाचा आहे. हा सामना त्याने येऊन पाहावा, असे आम्हा साऱ्यांना वाटते. त्यामुळे या सामन्याला त्याने उपस्थिती लावावी, अशी विनंती आम्ही केली आहे. पण धोनीने याबाबत आपले उत्तर दिलेले नाही."
अजय नाथ यांनी जरी धोनीच्या सहभागाबाबत काही सांगितले नसले तरी 'दी टेलीग्राफ'ने दिलेल्या वृत्तानुसार धोनी या सामन्याला हजेरी लावणार असल्याचे समजत आहे.