भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा कसोटी सामना गुरुवारपासून पुण्यातील गहूंजे स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. रोहित शर्मानं विशाखापट्टणम येथे झालेल्या पहिल्या कसोटीत प्रथमच सलामीला येताना दोन्ही डावांत शतकी खेळी करून अनेक विक्रम मोडले. त्याच्या या खेळीवर सर्व स्तरातून कौतुक झालं. त्यामुळे पुण्यातील कसोटीतही त्याच्याकडून अपेक्षा उंचावल्या आहेत. सामन्याच्या पुर्वसंध्येला कर्णधार विराट कोहलीलाही रोहितच्या खेळीबद्दल विचारण्यात आले, त्यावर कोहलीनं दिलेलं उत्तर एकण्यासारखं आहे...
पहिल्या कसोटीत रोहितनं पहिल्या डावात 244 चेंडूंत 23 चौकार व 6 षटकार खेचून 176 धावांची खेळी केली होती. दुसऱ्या डावात त्यानं 149 चेंडूंत 10 चौकार व 7 षटकार खेचून 127 धावांची खेळी केली. त्यानं दोन्ही डावांत मिळून एकूण 303 धावा केल्या आणि त्यात 33 चौकार व 13 षटकारांचा समावेश आहे. एकाच कसोटीत सर्वाधिक षटकार मारणारा तो जगातील एकमेव फलंदाज आहे. सलामीवीर म्हणून एकाच सामन्यात दोन्ही डावांत सर्वाधिक शतकं करण्याचा विक्रम सुनील गावस्कर यांच्या नावावर आहे. त्यांनी तीन वेळा अशी कामगिरी केली आहे. त्यानंतर राहुल द्रविड (2), रोहित ( 1), विराट कोहली ( 1), अजिंक्य रहाणे ( 1) आणि विजय हझारे ( 1) यांचा क्रमांक येतो.