India vs South Africa 3rd T20I Live Marathi : भारतीय संघाने तिसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यातं दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवून मालिका १-१ अशी बरोबरीत सोडवली. दक्षिण आफ्रिकेत ट्वेंटी-२०त शतक झळकावणाऱ्या पहिल्या भारतीयाचा मान आज सूर्यकुमार यादवने पटकावला. त्याला यशस्वी जैस्वालच्या अर्धशतकाची साथ मिळाली आणि भारताने २०१ धावांचा डोंगर उभा केला. त्यानंतर कुलदीप यादव ( ५-१७) , रवींद्र जडेजा या फिरकीपटूंसह अन्य गोलंदाजांनी दमदार कामगिरी केली.
मोहम्मद सिराजने पहिल्याच षटका आफ्रिकेला दबावाखाली आणले. त्या निर्धाव षटकानंतर दुसऱ्या षटकात मुकेश कुमारने आफ्रिकेचा सलामीवीर मॅथ्यू ब्रित्झकीला ( ४) त्रिफळाचीत केले. चौथ्या षटकात आफ्रिकेचा सलामीवीर रिझा हेंड्रीक्स ( ८) याला मोहम्मद सिराजने रन आऊट केले. हेनरीच क्लासेनला ( ५) अर्शदीप सिंगने आणि कर्णधार एडन मार्करामला ( २५) रवींद्र जडेजाने बाद केले. डोनोव्हन फेरेरा ( १२) याचा कुलदीप यादवने त्रिफळा उडवला आणि आफ्रिकेचा निम्मा संघ ७५ धावांत तंबूत पाठवला. डेव्हिड मिलरच्या बॅटला कट लागून चेंडू यष्टिरक्षक जितेश शर्माने टिपला अन् जोरदार अपील झाले. मैदानावरील अम्पायरने नाबाद दिले. भारताकडे DRS उपलब्ध होता, परंतु त्यांना तो घेता आला नाही. कारण त्याचवेळी DRS मध्ये तांत्रित बिघाड झाला होता.
पण, जडेजाने ११व्या षटकात अँडिले फेहलुकवायो ( ०) ची विकेट घेत यजमानांना सहावा धक्का दिला. पुढच्या षटकात कुलदीपने आणखी एक त्रिफळा उडवताना केशव महाराजला माघारी पाठवले. आफ्रिकेचे फलंदाज भारतीय फिरकीपटूंच्या हातचं खेळणं बनले होते. कुलदीपने त्याच्या पुढील षटकात पदार्पणवीर नांद्रे बर्गनला ( १) पायचीत केले. त्याची हॅटट्रिक हुकली. कुलदीपने पुढे धक्कासत्र सुरू ठेवले आणि आफ्रिकेचा संपूर्ण संघ ९५ धावांत तंबूत पाठवला. कुलदीपने २.५ षटकांत १७ धावा देताना ५ विकेट्स घेतल्या.
तत्पूर्वी, शुबमन गिल ( १२) व तिलक वर्मा ( ०) हे सलग दोन चेंडूंवर बाद झाल्यानंतर यशस्वी जैस्वाल व सूर्यकुमरा यादव यांनी ७० चेंडूंत ११२ धावांची भागादीर केली. यशस्वी ४१ चेंडूंत ६ चौकार व ३ षटकारांसह ६० धावा केल्या. रिंकू सिंगने ( १४) सूर्यासह २६ चेंडूंत ४७ धावांची भागीदारी केली. सूर्याने ५६ चेंडूंत ७ चौकार व ८ षटकारांसह १०० धावा केल्या. चार वेगवेगळ्या संघांविरुद्ध ट्वेंटी-२०त शतक झळकावणारा तो पहिला फलंदाज ठरला. भारताने २० षटकांत ७ बाद २०१ धावा उभ्या केल्या.
Web Title: India vs South Africa 3rd T20I Live Marathi : FIVE WICKET HAUL BY KULDEEP YADAV, India won by 106 runs, level the series 1-1
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.