बंगळुरु, भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका : भारतीय संघाने तिसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यात सुमार कामगिरी केली. त्याउलट दक्षिण आफ्रिकेनं आधीच्या सामन्यातील चुका सुधारल्या आणि विजय मिळवून मालिका 1-1 अशी बरोबरीत सोडवली. क्विंटन डी कॉक आणि रिझा हेंड्रीक्स यांनी आफ्रिकेला विजय मिळवून दिला. रॉयल चॅलेंजर बंगळुरूच्या घरच्या मैदानावर विराट कोहलीला पराभव पत्करावा लागला. आफ्रिकेनं 9 विकेट राखून हा सामना जिंकला. यावेळी चौथ्या क्रमांकावर कोणाला पाठवायचे, यावरून काहीतरी घोळ झाल्याची कबुली कर्णधार विराट कोहलीनं दिली.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात रिषभ पंत चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येणं अपेक्षित नव्हते, असेही कोहली म्हणाला. पंत आणि श्रेयस अय्यर यांच्यात चौथ्या क्रमांकावर कोण जाणार, याबाबत काहीतरी गैरसमज झाला असावा, असे कोहलीनं सांगितले. भारताचे दोन फलंदाज पहिल्या दहा षटकांत माघारी फिरल्यानंतर कोणाला पाठवायचे याची रणनीती ठरली होती. भारताचे दोन्ही सलामीवीर 8 षटकांत 63 धावांत माघारी परतले.
''तिथे काहीतरी नीट संवाद झाला नसावा. हे मला नंतर कळले. फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांनी या दोघांशी चर्चा केली होती आणि परिस्थितीनुसार कोण चौथ्या क्रमांकावर जाईल, हे त्यांना समजावले होते. पण, काहीतरी गैरसमज झाला. पंत आणि अय्यर दोघही चौथ्या क्रमांकावर येण्यासाठी तयार होते. जर ते दोघेही एकाच वेळी मैदानावर उतरले असते, तर हसं झालं असतं,''असे कोहलीने सांगितले. तो पुढे म्हणाला,''परिस्थितीनुसार आम्ही योजना आखली होती. दहा षटकानंतर रिषभ पंत येणार असे ठरले होते, तत्पूर्वी श्रेयस येणार होता. ते दोघेही संभ्रमात सापडले, असे मला वाटले आणि त्यांनाच कळले नाही कधी कोणी जायचे म्हणून.''