भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवसाचे पहिले सत्र रोहित शर्मा व अजिंक्य रहाणेनं गाजवलं. 3 बाद 39 अशा अडचणीत सापडलेल्या टीम इंडियाला त्यानं उपकर्णधार अजिंक्य रहाणेसह बाहेर आणले. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 267 धावांची भागीदारी करताना संघाला मजबूत स्थितीत आणले. अजिंक्यने 11 वे कसोटी शतक झळकावले. त्यानंतर रोहितनं दमदार फटकेबाजी केली. उपाहारापर्यंत भारताच्या 4 बाद 357 धावा केल्या आहेत. अजिंक्य बाद झाला असला तरी त्यानं सचिन तेंडुलकर आणि पॉली उम्रीगर यांच्याशी बरोबरी केली.
अजिंक्यनं 192 चेंडूंत 17 चौकार व 1 षटकार लगावत 115 धावा केल्या. या जोडीनं भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिकेत सर्वोत्तम भागीदारी करणाऱ्या भारतीय जोडीत तिसरे स्थान पटकावले. या जोडीनं चौथ्या विकेटसाठी 267 धावांची भागीदारी केली. अवघ्या एका धावेनं राहुल द्रविड व वीरेंद्र सेहवाग यांच्या ( 268 धावा, 2008 ) विक्रमाशी बरोबरी करण्यापासून ही जोडी हुकली. आफ्रिकेविरुद्ध मयांक अग्रवाल आमि रोहित शर्मा यांनी केलेली 317 धावांची भागीदारी ही सर्वोत्तम आहे.
भारताकडून चौथ्या विकेटसाठीही ही पाचवी सर्वोत्तम भागीदारी ठरली. परंतु, संघाची अवस्था 3 बाद 40 किंवा त्याहून बिकट असताना चौथ्या विकेटने केलेली ही जगभरातली सहावी सर्वोत्तम भागीदारी ठरली. विशेष म्हणजे अव्वल पाचमध्ये एकाही भारतीय जोडीचा समावेश नाही. भारताकडून पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करताना सर्वाधिक शतक झळकावणाऱ्या फलंदाजांत अजिंक्यनं पॉली उम्रीगर यांच्याशी बरोबरी केली. अजिंक्यची ही पाचव्या क्रमांकावरील आठवे शतक ठरले. या विक्रमा मोहम्मद अझरुद्दीन ( 16) अव्वल स्थानी आहे.
चौथ्या विकेटसाठी सर्वाधिक 200+ भागीदारी करणाऱ्या फलंदाजांत अजिंक्यनं महान फलंदाज तेंडुलकरशी बरोबरी केली आहे. अजिंक्यनं चौथ्या विकेटसाठी 5व्यांदा 200+ धावांची भागीदारी केली. तेंडुलकरच्या नावावर 5वेळा 200+ धावांची भागीदारी आहे. त्यानंतर सौरव गांगुली ( 3), विराट कोहली ( 3), व्हीव्हीएस लक्ष्मण ( 2) यांचा क्रमांक येतो.