भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका तिसऱ्या कसोटीला शनिवारपासून सुरुवात होत आहे. रांची येथे होणाऱ्या या कसोटीत टीम इंडियाचेच पारडे जड मानले जात आहे. भारतानं या मालिकेतील पहिले दोन सामने जिंकून 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. या सामन्यापूर्वी आफ्रिकेचे दोन महत्त्वाचे खेळाडू दुखापतग्रस्त झाले आहेत. केशव महाराज आणि एडन मार्कराम यांनी या सामन्यातून माघार घेतल्यानं पाहुण्यांच्या अडचणी अजून वाढल्या आहेत. मालिकेत आघाडीवर असलेली टीम इंडिया तिसऱ्या कसोटीत संघात काही बदल करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कुलदीप यादवनं शुक्रवारी नेट्समध्ये कसून सराव केल्यामुळे ही शक्यता निर्माण झाली आहे.
भारताने पहिल्या कसोटीत 203 धावांनी, तर दुसऱ्या कसोटीत एक डाव व 137 धावांनी विजय मिळवला आहे. रोहित शर्मा, मयांक अग्रवाल, विराट कोहली यांनी फलंदाजीत तर आर अश्विन, रवींद्र जडेजा यांनी गोलंदाजीत प्रभाव पाडला आहे. रिषभ पंत आणि कुलदीप यादव अजूनही संघातील स्थान मिळवण्याच्या प्रतिक्षेत आहेत. या दोघांनाही पहिले दोन्ही सामने बाकावर बसून पाहावे लागले. सातत्यपूर्ण कामगिरी करण्यात अपयशी ठरलेल्या पंतला अंतिम अकरात न खेळवण्याचा निर्णय कोहलीनं घेतला आहे. त्यामुळे वृद्धीमान साहाला संधी मिळाली आणि त्यानंही संधीचं सोनं केलं.
अश्विननेही कसोटी संघात झोकात पदार्पण केले आणि जडेजानं गोलंदाजी व फलंदाजीतही चांगली प्रभाव दाखवला आहे. जर खेळपट्टी फिरकीला पोषक असेल, तर कोहली तीन जलदगती गोलंदाजांसह न उतरता अतिरिक्त अष्टपैलू खेळाडू खेळवू शकतो. अशात हनुमा विहारीला संधी मिळून उमेश यादव किंवा मोहम्मद शमीला विश्रांती दिली जाऊ शकते. पण, तिसऱ्या कसोटीला सामोरे जाताना भारतीय संघात बदल होणे तुर्तास तरी अवघड आहे. कोहली याच विजयी संघासह रांचीच्या स्टेडियमवर उतरू शकतो.
अशी असेल टीम इंडिया
रोहित शर्मा, मयांक अग्रवाल, विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, आर अश्विन, रवींद्र जडेजा, वृद्धीमान साहा, इशांत शर्मा, उमेश यादव/मोहम्मद शमी.