भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसऱ्या कसोटीतही पाहुण्यांनी शरणागती पत्करली. भारताच्या पहिल्या डावातील 9 बाद 497 ( डाव घोषित) धावांचा पाठलाग करताना आफ्रिकेचा डाव 162 धावांत गडगडला. उमेश यादव, मोहम्मद शमी, रवींद्र जडेजा, शाहबाज नदीम यांनी उत्तम गोलंदाजी केली. एकवेळी आफ्रिकेचा डाव 3 बाद 107 असा मजबूत स्थितीत दिसत होता, परंतु भारतीय गोलंदाजांनी त्यांना जबरदस्त धक्के दिले. भारताने पहिल्या डावात 335 धावांची आघाडी घेतली आहे. कर्णधार विराट कोहलीनं फॉलोऑन देऊन ऐतिहासिक कामगिरी केली. दुसऱ्या दिवशी रोहित शर्मानं द्विशतक आणि अजिंक्य रहाणेनं शतक झळकावले. रोहितचे कसोटी क्रिकेटमधील हे पहिलेच द्विशतक ठरले, तर अजिंक्यचे 11वे शतक ठरले. या दोघांनी 267 धावांची विक्रमी भागीदारी करताना भारताला मजबूत स्थितित आणले. या दोघांच्या फटकेबाजीच्या जोरावर भारताने चारशे धावांचा पल्ला पार केला. 3 बाद 39 अशा अडचणीत सापडलेल्या टीम इंडियाला त्यानं उपकर्णधार अजिंक्य रहाणेसह मजबूत स्थितित आणले. त्यानंतर रवींद्र जडेजानं अर्धशतकी खेळी केली. भारतानं पहिला डाव 9 बाद 497 धावांवर घोषित केला. प्रत्युत्तरात आफ्रिकेचे दोन फलंदाज अवघ्या 9 धावांत माघारी परतले होते.
तिसऱ्या दिवसाच्या पहिल्याच षटकात उमेश यादवनं अप्रतीम चेंडू टाकून आफ्रिकेचा कर्णधार फॅफ ड्यू प्लेसिसचा त्रिफळा उडवला. त्यानंतर झुबायर हम्झा आणि टेंबा बवुमा यांनी चौथ्या विकेटसाठी 91 धावांची भागीदारी केली. ही जोडी भारताची डोकेदुखी वाढवेल असे वाटले होते. पण, रवींद्र जडेजानं अर्धशतक झळकावणाऱ्या हम्झाला बाद केले. हम्झानं 79 चेंडूंत 10 चौकार व 1 षटकार खेचून 62 धावा केल्या. पंधरा वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीनंतर प्रथमच टीम इंडियाकडून पदार्पण करणाऱ्या शाहबाज नदीमनं भारताला यश मिळवून दिले. त्यानं बवूमाला बाद करून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिली विकेट पटकावली. बवूमानं 72 चेंडूंत 5 चौकारांच्या मदतीनं 32 धावा केल्या होत्या. कसोटी संघात पदार्पण करणाऱ्या हेन्रीक क्लासेनला रवींद्र जडेजानं त्रिफळाचीत केले. उपाहारानंतर मोहम्मद शमीनं आफ्रिकेला धक्का दिला. त्यानं डी पिएडतला माघारी पाठवले. पण, अॅनरिच नोर्टजे आणि जॉर्ज लिंडे यांनी नवव्या विकेटसाठी संघर्ष केला. या दोघांनी खेळपट्टीवर चांगला जम बसवत भारतीय गोलंदाजांना हैराण केले. या दोघांची 32 धावांची भागीदारी उमेश यादवने संपुष्टात आणली. त्यानं लिंडेला ( 37) माघारी पाठवले. त्यानंतर पुढच्याच षटकात नदीमनं आफ्रिकेचा अखेरचा फलंदाज माघारी पाठवला.
प्रतिस्पर्धी संघाला सर्वाधिक वेळ फॉलोऑन देणाऱ्या भारतीय कर्णधारांमध्ये विराटनं अव्वल स्थान पटकावले आहे. त्यानं आठव्यांदा प्रतिस्पर्धी संघाला फॉलोऑन दिला. मोहम्मद अझरुद्दीन ( 7), महेंद्रसिंग धोनी ( 5), सौरव गांगुली ( 4) या विक्रमात पिछाडीवर आहेत.