Join us  

India vs South Africa 3rd Test, Virat & Gambhir: विराट कोहलीच्या 'इगो' बद्दल गौतम गंभीरचं मोठं विधान, नक्की काय म्हणाला वाचा

विराटने आफ्रिकेच्या गोलंदाजांविरूद्ध संयमी फलंदाजी करत ७९ धावा केल्या. पण त्याला शतक ठोकता आलं नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2022 1:55 PM

Open in App

IND vs SA 3rd test: भारतीय संघाने तिसऱ्या कसोटीची सुरूवात एकदम खराब केली. पहिल्या दिवशी नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर भारताचा पहिला डाव २२३ धावांतच आटोपला. पहिल्या तासाभराच्या खेळातच संघातील महत्त्वाच्या फलंदाजांनी निराश केलं. त्यानंतर विराट वगळता कोणताच खेळाडू चांगली झुंज देऊ शकला नाही. विराटने मात्र तब्बल २०१ चेंडूंचा सामना करत ७९ धावांची उपयुक्त खेळी केली. या खेळीनंतर अनेकांनी विराटचं कौतुक केलं. आपल्या वक्तव्यांमुळे सदैव चर्चेत असणारा माजी सलामीवीर गौतम गंभीर याने विराटच्या 'इगो' संबंधी महत्त्वाचं विधान केलं.

"विराट अनेकदा म्हणाला आहे की इंग्लंडमध्ये खेळताना तुम्ही तुमचा इगो भारतात ठेवूनच मैदानात उतरायला हवं. आफ्रिकेविरूद्ध आज (तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी) विराट अगदी तसाच खेळला. विराटने आपला इगो किट बॅगमध्ये ठेवला आणि त्याने झुंजार खेळी केली. विराटच्या आजच्या खेळीमुळे मला त्याचा इंग्लंडमधील यशस्वी दौरा पुन्हा नव्याने आठवला", असं गौतम गंभीर म्हणाला.

"इंग्लंड दौऱ्यावर विराट कोहली अनेक वेळा हुकला होता. पण असं असतानाही त्याने ऑफ स्टंपबाहेरील अनेक चेंडू सोडून दिले. आफ्रिकेच्या गोलंदाजांविरूद्धही त्याने तेच केलं. तो अनेक वेळा चेंडू न कळल्याने हुकला पण तरीही त्याने स्वत:चा इगो बाजूला ठेवला आणि खेळावर लक्ष दिलं. तो गोलंदाजांवर वर्चस्व गाजवायला गेला नाही, उलट त्याने संयमाने फलंदाजी केली", अशा शब्दात गंभीरने विराटच्या खेळीची स्तुती केली.

विराटला सल्ले देणाऱ्यांना गंभीरने सुनावलं!

विराटला अनेकांनी कव्हर ड्राइव्ह न खेळण्याचा सल्ला दिला होता. त्यांना गंभीरने चांगलंच सुनावलं. "जर एखादा खेळाडू कट शॉट खेळून बाद होत असेल तर त्याला तो शॉट खेळण्यापासून रोखू नये. स्ट्रेट ड्राइव्ह खेळतानाही फलंदाज बाद होतो. पण त्यावेळी त्याला तो शॉट खेळण्यापासून रोखलं जात नाही. मग कव्हर ड्राइव्ह खेळणं बंद करायला का सांगितलं जातं? रोहित शर्मा आखूड टप्प्याच्या गोलंदाजीवर पुल शॉट खेळताना बाद झाला आणि त्याला तोच शॉट खेळण्यापासून तुम्ही रोखायला सुरूवात केलीत तर मग फलंदाजाने धावा बनवायच्या कशा? विराटने आपले पसंतीचे शॉट्स खेळत राहायला हवं. फक्त त्याने योग्य चेंडू पाहून ते शॉट्स खेळावेत", असं मत गंभीरने व्यक्त केलं होतं.

टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाविराट कोहलीगौतम गंभीर
Open in App