IND vs SA 3rd Test: भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहली आफ्रिकेविरूद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळला नव्हता. त्याच्या पाठीच्या दुखण्याने उचल खाल्ल्यामुळे त्याने विश्रांती घेतली होती. पण आता तो फिट असून आजपासून सुरू होणाऱ्या कसोटी सामन्यात तो संघाचे नेतृत्व करणार आहे. भारताने आफ्रिकेत आतापर्यंत कधीच कसोटी मालिका जिंकलेली नाही. कसोटी मालिका सध्या १-१ अशी बरोबरीत आहे. अशा परिस्थितीत शेवटची कसोटी जिंकून नवा इतिहास रचण्याची टीम इंडियाला संधी आहे. मात्र याच दरम्यान, भारताचा माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर या विराटबद्दल एक मोठं विधान केलं.
विराट कोहली हा एक महान फलंदाज आहे. सध्या तो चांगल्या लयीत नाहीये. IPL 2021मध्येही मी पाहिलंय आणि आताही काही काळापासून पाहतोय की विराटचा स्वत:वरील विश्वास थोडासा डळमळीत झाल्याचं जाणवतंय. विराटच्या बाबतीत असं काही घडेल असं मला कधीही वाटलं नव्हतं. आणि म्हणूनच क्रिकेटमध्ये म्हणतात की खेळाडूला सगळ्या प्रकारांमधून जावं लागतं", असं मत संजय मांजरेकरांनी व्यक्त केलं.
"विराट कोहलीने गेल्या काही दिवसांत लौकिकाला साजेसा खेळ केलेला नाही. बऱ्याच डावात त्याने धावाही केलेल्या नाहीत. त्याचा आत्मविश्वास कमी झाल्याचं स्पष्ट दिसतंय. पण असं असलं तरी तो उत्तम फलंदाज आहेत. तो लवकरच धावा करायला सुरूवात करेल आणि फॉर्ममध्ये परतेल. लवकरच त्याच्या कामगिरीत सातत्य येईल. तिसऱ्या कसोटी सामन्यात तो लयीत परतेल अशी मला दाट शक्यता वाटते", असा विश्वास मांजरेकर यांनी व्यक्त केला.
तिसऱ्या आणि निर्णायक कसोटीत विराटला एक मोठा पराक्रम करण्याची संधी आहे. दक्षिण आफ्रिकेत भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत विराट सध्या तिसऱ्या क्रमांकावर आहे. विराटने तिसऱ्या कसोटीत १४ धावा केल्यास तो खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर जाऊ शकतो. विराटने आतापर्यंत आफ्रिकेत सहा कसोटी खेळल्या असून त्यात ५१ च्या सरासरीने ६११ धावा केल्या आहेत. यात २ शतके आणि २ अर्धशतकांचा समावेश आहे. या यादीत सध्या सचिन तेंडुलकर अव्वल तर मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड दुसऱ्या क्रमांकावर आहे.