भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी रोहित शर्मानं द्विशतक आणि अजिंक्य रहाणेनं शतक झळकावले. रोहितचे कसोटी क्रिकेटमधील हे पहिलेच द्विशतक ठरले, तर अजिंक्यचे 11वे शतक ठरले. या दोघांनी 267 धावांची विक्रमी भागीदारी करताना भारताला मजबूत स्थितित आणले. या दोघांच्या फटकेबाजीच्या जोरावर भारताने चारशे धावांचा पल्ला पार केला. 3 बाद 39 अशा अडचणीत सापडलेल्या टीम इंडियाला त्यानं उपकर्णधार अजिंक्य रहाणेसह मजबूत स्थितित आणले. त्यानंतर रवींद्र जडेजानं अर्धशतकी खेळी केली. भारतानं पहिला डाव 9 बाद 497 धावांवर घोषित केला.
अजिंक्यने 192 चेंडूंत 17 चौकार व 1 षटकार लगावत 115 धावा केल्या. रोहित 255 चेंडूंत 28 चौकार व 6 षटकार खेचून 212 धावांत माघारी परतला. या जोडीनं भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिकेत सर्वोत्तम भागीदारी करणाऱ्या भारतीय जोडीत तिसरे स्थान पटकावले. या जोडीनं चौथ्या विकेटसाठी 267 धावांची भागीदारी केली. अवघ्या एका धावेनं राहुल द्रविड व वीरेंद्र सेहवाग यांच्या ( 268 धावा, 2008 ) विक्रमाशी बरोबरी करण्यापासून ही जोडी हुकली. आफ्रिकेविरुद्ध मयांक अग्रवाल आमि रोहित शर्मा यांनी केलेली 317 धावांची भागीदारी ही सर्वोत्तम आहे. रवींद्र जडेजाने 119 चेंडूंत 4 चौकारांसह 54 धावा केल्या.