भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका : भारताने दक्षिण आफ्रिकेवर तिसऱ्या सामन्यातही दमदार विजय मिळवला. या विजयासह भारताने दक्षिण आफ्रिकेला व्हाइट वॉश दिला. भारताचा हा विजयोत्सव पाहायला एक खास व्यक्ती रांचीच्या स्डेडियममध्ये उपस्थित होती. या खास व्यक्तीची दखल बीसीसीआयनेही घेतली आहे. बीसीसीआयने आपल्या ट्विटरवर या व्यक्तीचा फोटोही पोस्ट केला आहे.
या खास व्यक्तीची वाट सर्वच जण पाहत होते. कारण या व्यक्तीने हा विजयोत्सव पाहावा, अशी बऱ्याच जणांना आशा होती. ही व्यक्ती गेले तीन दिवस स्टेडियममध्ये फिरकलीही नव्हती. पण आज भारताच्या विजयाच्या दिनी मात्र ही व्यक्ती स्टेडियममध्ये उपस्थित होती. फक्त स्टेडियमपुरता मर्यादीत न राहता ही व्यक्ती भारताच्या ड्रेसिंग रुममध्येही आली आणि काही खेळाडूंशी बातचीतही केली.
आता ही व्यक्ती कोण, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर ही व्यक्ती म्हणजे रांचीचा सुपूत्र आणि भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी. सामन्याच्या चौथ्या दिवशी भारताचा विजयोत्सव पाहण्यासाठी धोनी उपस्थित होता. सामना संपल्यावर त्याने काही खेळाडूंशी बातचीतही केली. बीसीसीआयने धोनी आणि भारताचा फिरकीपटू शाहबाझ नदीम यांचा एक फोटो आपल्या ट्विटरवर पोस्ट केला आहे. हा पाहा आला तरी कोण, अशी बीसीसीआयने या ट्विटरवर पोस्ट केलेल्या फोटोला कॅप्शनही दिली आहे.
भारताने या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत दोन वेळा दक्षिण आफ्रिकेवर फॉलोऑन लादला. यापूर्वी भारताने एका मालिकेत कोणत्याही संघाला तब्बल दोनदा फॉलोऑन देऊन मोठे विजय मिळवलेले नाहीत. त्याचबरोबर आतापर्यंत एका मालिकेत दोन किंवा त्यांच्यापेक्षा जास्तवेळा दक्षिण आफ्रिकेला फॉलोऑन देण्याची घटना तब्बल 84 वर्षांनी घडली आहे. यापूर्वी 1935 साली ऑस्ट्रेलियाने असा पराक्रम केला होता. त्यांनी तब्बल सलग तीन सामन्यांमध्ये फॉलोऑन देत सामना जिंकला होता.
आपल्याच मातीमध्ये भारताच्या कर्णधाराला विराटसारखी कामगिरी करता आलेली नाही. कोहलीने आपल्याच मैदानात तब्बल तीनवेळा प्रतिस्पर्ध्यांना व्हाइट वॉश देण्याची किमया साधली आहे. आतापर्यंत एकाही भारताच्या कर्णधाराला आपल्याच मैदानात तीन कसोटी मालिकांमध्ये निर्भेळ यश संपादन करता आलेले नाही. यापूर्वी भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरूद्दिनने दोन वेळा दोन कसोटी मालिकांमध्ये निर्भेळ यश संपादन केले होते.
भारताने तिसऱ्या कसोटी सामन्यात तब्बल एक डाव आणि 202 धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारताने ही मालिका 3-0 अशा फरकाने जिंकली आहे.