Join us  

India vs South Africa, 3rd Test : रोहित शर्माकडून आफ्रिकेची शिकार; असा विक्रम करणारा पहिलाच भारतीय

रोहित आणि अजिंक्य रहाणेने पहिल्या दिवशी भारताचा डाव सावरला.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2019 10:56 AM

Open in App

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवसाचा पहिला चौकार रोहित शर्मानं ठोकला. रोहित आणि अजिंक्य रहाणेने पहिल्या दिवशी भारताचा डाव सावरला. 3 बाद 39 अशा अडचणीत सापडलेल्या टीम इंडियाला त्यानं उपकर्णधार अजिंक्य रहाणेसह बाहेर आणले. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 200 हून अधिक धावांची भागीदारी करताना संघाला मजबूत स्थितीत आणले. दुसऱ्या दिवशी अजिंक्यनेही 11 वे कसोटी शतक झळकावले. त्यानंतर रोहितनं 150 धावांचा पल्ला ओलांडला. या कामगिरीसह रोहितनं आफ्रिकेची शिकार केली. 

रोहितनं दुसऱ्या दिवशी पहिला चौकार खेचून प्रथम श्रेणी क्रिकेटमधील 7000 धावांचा पल्ला पार केला. या कामगिरीसह त्यानं ऑस्ट्रेलियाचे महान फलंदाज सर डॉन ब्रॅडमन यांच्या कसोटी क्रिकेटमधील 6996 धावांचा पल्ला ओलांडला.  त्यानंतर रोहितनं जोरदार फटकेबाजी करताना 150 धावांचा पल्ला ओलांडला. जानेवारी 2013नंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा 150+ धावा करणाऱ्या फलंदाजांत रोहितनं ( 10) दुसरे स्थान पटकावले. विराट कोहलीनं 13 वेळा अशी कामगिरी केली आहे. रोहितनं ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ ( 9) ला मागे टाकले. त्यानंतर डेव्हिन वॉर्नर ( 7), केन विलियम्सन ( 6) आणि जो रूट ( 6) यांचा क्रमांक येतो.  

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सर्वाधिक तीन वेळा 150+ धावा करणाऱ्या फलंदाजांत रोहितनं वीरेंद्र सेहवाग, विराट कोहली आणि सचिन तेंडुलकर यांच्याशी बरोबरी केली आहे. शिवाय एकाच कसोटी मालिकेत दोन वेळा 150+ धावा करणारा रोहित पाचवा भारतीय सलामीवीर ठरला आहे. विनू मांकड ( वि. न्यूझीलंड, 1955/56), सुनील गावस्कर ( वि. वेस्ट इंडिज, 1978/79),  सुनील गावस्कर ( वि. ऑस्ट्रेलिया, 1985/86), वीरेंद्र सेहवाग ( वि. पाकिस्तान, 2004/05), मुरली विजय ( वि. ऑस्ट्रेलिया, 2012/13) यांनी यापूर्वी अशी कामगिरी केली आहे. या शिवाय दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकाच मालिकेत 150+ धावा दोन वेळा करणारा रोहित पहिलाच भारतीय ठरला आहे. 

टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकारोहित शर्माअजिंक्य रहाणे