भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवसाचा पहिला चौकार रोहित शर्मानं ठोकला. रोहित आणि अजिंक्य रहाणेने पहिल्या दिवशी भारताचा डाव सावरला. 3 बाद 39 अशा अडचणीत सापडलेल्या टीम इंडियाला त्यानं उपकर्णधार अजिंक्य रहाणेसह बाहेर आणले. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 267 धावांची भागीदारी करताना संघाला मजबूत स्थितीत आणले. दुसऱ्या दिवशी अजिंक्यनेही 11 वे कसोटी शतक झळकावले. त्यानंतर रोहितनं 150 धावांचा पल्ला ओलांडला. या कामगिरीसह रोहितनं कसोटी कारकिर्दीतील सर्वोत्तम धावाची नोंद केली. त्यानं या कसोटीत 500+ धावा करण्याचा विक्रमही केला. एका कसोटी मालिकेत 500+ धावा करणारा तो पाचवा भारतीय सलामीवीर ठरला, परंतु वीरेंद्र सेहवाग आणि रोहित यांच्या खेळीत साम्य राहिले.
रोहितनं दुसऱ्या दिवशी पहिला चौकार खेचून प्रथम श्रेणी क्रिकेटमधील 7000 धावांचा पल्ला पार केला. या कामगिरीसह त्यानं ऑस्ट्रेलियाचे महान फलंदाज सर डॉन ब्रॅडमन यांच्या कसोटी क्रिकेटमधील 6996 धावांचा पल्ला ओलांडला. त्यानंतर रोहितनं जोरदार फटकेबाजी करताना 150 धावांचा पल्ला ओलांडला. जानेवारी 2013नंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा 150+ धावा करणाऱ्या फलंदाजांत रोहितनं ( 10) दुसरे स्थान पटकावले. विराट कोहलीनं 13 वेळा अशी कामगिरी केली आहे. रोहितनं ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ ( 9) ला मागे टाकले. त्यानंतर डेव्हिन वॉर्नर ( 7), केन विलियम्सन ( 6) आणि जो रूट ( 6) यांचा क्रमांक येतो.
रोहितनं 178* धावांचा पल्ला पार करून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वोत्तम वैयक्तिक खेळीची नोंद केली. त्यानं कोलकाता कसोटीत 2013साली 177 धावा केल्या होत्या. तो विक्रम आज मोडला अन् त्यानं द्विशतकाच्या दिशेनं कूच केली. रोहितनं दोनशे धावांच्या नजीक कामगिरी करताना मालिकेत 500+ धावा करण्याचा विक्रम केला. एकाच कसोटी मालिकेत 500+ धावा करणारा रोहित भारताचा पाचवा सलामीवीर ठरला. यापूर्वी विनू मांकड, बुधी कुंदरन, सुनील गावस्कर ( 5), वीरेंद्र सेहवाग यांनी अशी कामगिरी केली आहे. पण, सेहवागनंतर तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत 500+ धावा करणारा रोहित हा पहिलाच सलामीवीर ठरला.