भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवसाचा पहिला चौकार रोहित शर्मानं ठोकला. रोहित आणि अजिंक्य रहाणेने पहिल्या दिवशी भारताचा डाव सावरला. 3 बाद 39 अशा अडचणीत सापडलेल्या टीम इंडियाला त्यानं उपकर्णधार अजिंक्य रहाणेसह बाहेर आणले. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 185 धावांची भागीदारी करताना संघाला दोनशेपल्ल्याड पल्ला गाठून दिला. रोहित 164 चेंडूंत 14 चौकार व 4 षटकार खेचून 117, तर अजिंक्य 135 चेंडूंत 11 चौकार व 1 षटकार खेचून 83 धावांवर खेळत आहे. भारतानं पहिल्या दिवशी 3 बाद 224 धावा केल्या होत्या. त्यात दुसऱ्या दिवशी ते आणखी भर घालत आहेत. रोहितनं रविवारी चौकार ठोकून एक पल्ला पार केला आणि सर डॉन ब्रॅडमन यांनाही पिछाडीवर टाकले.
कालचा दिवस रोहितनं गाजवला. आयसीसी जागतिक अजिंक्यपद कसोटी स्पर्धेत रोहितने सर्वाधिक षटकार खेचणाऱ्या फलंदाजात अव्वल स्थान पटकावलं. त्यानं इंग्लंडच्या बेन स्टोक्सला ( 13) मागे टाकले. रोहितनं 4 डावांत 14 षटकार खेचले आहेत. स्टोक्सने 10 डावांत 13 षटकार खेचले आहेत. त्यानंतर मयांक अग्रवाल ( 8) आणि रवींद्र जडेजा ( 7) यांचा क्रमांक येतो. रोहितनं कसोटी क्रिकेटमध्ये 2000 धावांचा पल्ला पार केला. एका कसोटी मालिकेत तीन शतकं झळकावणारा रोहित हा दुसरा भारतीय सलामीवीर ठरला आहे. यापूर्वी सुनील गावस्कर यांनी तीन वेळा अशी कामगिरी केली आहे.
यंदाच्या कॅलेंडर वर्षातील रोहितचे हे नववे आंतरराष्ट्रीय शतक ठरलं. त्यानं या कामगिरीसह सचिन तेंडुलकरच्या विक्रमाशी बरोबरी केली. तेंडुलकरने 1998 च्या कॅलेंडर वर्षात 9 शतकं झळकावली होती. त्यानंतर ग्रॅमी स्मिथ ( 2005) आणि डेव्हिड वॉर्नर ( 2016) यांनी कॅलेंडर वर्षात नऊ आंतरराष्ट्रीय शतकं ठोकली आहे. तेंडुलकरनंतर अशी कामगिरी करणारा रोहित पहिलाच भारतीय सलामीवीर ठरला. त्यात रविवारी रोहितनं आणखी एका विक्रमाची भर घातली. त्यानं प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 7000 धावांचा पल्ला पार केला. या कामगिरीसह त्यानं ऑस्ट्रेलियाचे महान फलंदाज सर डॉन ब्रॅडमन यांच्या कसोटी क्रिकेटमधील 6996 धावांचा पल्ला ओलांडला.