भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका तिसऱ्या कसोटीचे पहिले सत्र पाहुण्यांनी गाजवलं. कागिसो रबाडा आणि अॅऩरिच नोर्ट्जे यांनी उपाहारापर्यंत भारताचे तीन फलंदाज अवघ्या 71 धावांत माघारी पाठवले. पण, रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे या जोडीनं ही पडझड थांबवली. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 32 धावा जोडल्या आहेत आणि त्यांच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे. या सामन्यात रोहितनं एका विक्रमाला गवसणी घातली आहे. आयसीसीच्या जागतिक अजिंक्यपद कसोटी स्पर्धेंतर्गत ही कसोटी आहे. त्यात हा विक्रम करणारा रोहित पहिलाच भारतीय ठरला आहे. रोहितनं अर्धशतकी खेळी करून आणखी एक पराक्रम केला.
आयसीसी जागतिक अजिंक्यपद कसोटी स्पर्धेत रोहितने सर्वाधिक षटकार खेचणाऱ्या फलंदाजात अव्वल स्थान पटकावलं. त्यानं इंग्लंडच्या बेन स्टोक्सला ( 13) मागे टाकले. रोहितनं 4 डावांत 14 षटकार खेचले आहेत. स्टोक्सने 10 डावांत 13 षटकार खेचले आहेत. त्यानंतर मयांक अग्रवाल ( 8) आणि रवींद्र जडेजा ( 7) यांचा क्रमांक येतो. आफ्रिकेविरुद्धच्या या मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजात रोहितनं आघाडी घेतली आहे. रोहित 101 चेंडूंच सामना करून 58 धावांवर खेळत आहे.
आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत सर्वाधिक तीन वेळा 50+ धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांत त्यानं गौतम गंभीर ( 2010) आणि मोहम्मद अझरुद्दीन ( 1996) यांच्याशी बरोबरी केली.