भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका तिसऱ्या कसोटीचे पहिले सत्र पाहुण्यांनी गाजवलं. कागिसो रबाडा आणि अॅऩरिच नोर्ट्जे यांनी उपाहारापर्यंत भारताचे तीन फलंदाज अवघ्या 71 धावांत माघारी पाठवले. पण, रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे या जोडीनं ही पडझड थांबवली. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 32 धावा जोडल्या आहेत आणि त्यांच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे. या सामन्यात रोहितनं एका विक्रमाला गवसणी घातली आहे. आयसीसीच्या जागतिक अजिंक्यपद कसोटी स्पर्धेंतर्गत ही कसोटी आहे. त्यात हा विक्रम करणारा रोहित पहिलाच भारतीय ठरला आहे.
नाणेफेक जिंकून कोहलीनं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण, पाचव्याच षटकात भारताला पहिला धक्का बसला. कागिसो रबाडानं पाचव्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर मयांक अग्रवालला ( 10) डिन एल्गरकरवी झेलबाद करून माघारी पाठवले. त्यानंतर चेतेश्वर पुजारा भोपळा न फोडताही रबाडाच्या गोलंदाजीवर पायचीत होऊन माघारी परतला. कर्णधार विराट कोहलीही ( 12) अॅनरीच नॉर्ट्झेच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. पण, त्यानंतर रोहित व रहाणे यांनी डाव सावरला. उपाहारापर्यंत रोहितनं एक षटकार मारला आणि हाच षटकार विक्रमी ठरली.
आयसीसी जागतिक अजिंक्यपद कसोटी स्पर्धेत रोहितने सर्वाधिक षटकार खेचणाऱ्या फलंदाजात अव्वल स्थान पटकावलं. त्यानं इंग्लंडच्या
बेन स्टोक्सला ( 13) मागे टाकले. रोहितनं 4 डावांत 14 षटकार खेचले आहेत. स्टोक्सने 10 डावांत 13 षटकार खेचले आहेत. त्यानंतर मयांक अग्रवाल ( 8) आणि रवींद्र जडेजा ( 7) यांचा क्रमांक येतो.
विराटच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी; पुढच्या मालिकेत कर्णधारपद रोहित शर्माकडे?
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका तिसरी कसोटी उद्यापासून सुरू होत आहे. या कसोटी सामन्यानंतर भारतीय संघ आठवडाभर सुट्टीवर जाणार आहे. त्यानंतर टीम इंडियाचा सामना करण्यासाठी बांगलादेशचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. तीन ट्वेंटी-20 आणि दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी लवकरच टीम इंडियाची निवड केली जाणार आहे. भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी विश्रांतीवर असल्यानं त्याचे या मालिकेतही खेळणे जवळपास अशक्यच आहे. या मालिकेत काही महत्त्वाचे बदलही पाहायला मिळणार आहेत.
भारतीय संघ ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या तयारीच्या दृष्टीनं विचार करत आहे. त्यामुळे ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेसाठी सर्वोत्तम संघ निवडण्याची प्रक्रिया आतापासूनच सुरु झाली आहे. त्यामुळे अधिकाधिक युवा खेळाडूंना संधी देऊन त्याची चाचपणी केली जाणार आहे. त्यात संघातील वरिष्ठ खेळाडूंवर पडणारा ताणही लक्षात घेतला जाणार आहे. म्हणूनच बांगलादेशविरुद्धच्या मालिकेत कर्णधार विराट कोहलीला विश्रांती देण्याचा विचार भारतीय क्रिकेट नियामक मंडळ ( बीसीसीआय) करत आहे. त्यामुळे या मालिकेत कर्णधारपदाची जबाबदारी रोहित शर्मा सांभाळू शकतो.
Web Title: India vs South Africa, 3rd Test : Rohit Sharma overtakes Ben Stokes in hitting maximum sixes in ICC WTC after playing just four innings
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.