IND vs SA 3rd Test: भारतीय संघाचा पहिला डाव २२३ धावांवर आटोपल्यानंतर आफ्रिकेचा पहिला डाव २१० धावांत गुंडाळण्यात भारताला यश आलं. त्यामुळे भारताला पहिल्या डावाअंती १३ धावांची निसटती आघाडी मिळाली. त्यानंतर दुसऱ्या डावातही भारताच्या फलंदाजांनी निराशा केली. राहुल, मयंक, पुजारा आणि रहाणे चौघेही स्वस्तात बाद झाले. ऋषभ पंतने आक्रमक खेळी करत आफ्रिकन गोलंदाजांवर हल्लाबोल केला. त्याला कर्णधार विराट कोहलीने चांगली साथ दिली. पण पुन्हा एकदा तीच चूक करत विराट कोहलीने स्वत:ची विकेट बहाल केली.
विराट कोहली पहिल्या कसोटीत ऑफ स्टंपच्या बाहेरील चेंडूवर फटका मारताना बाद झाला होता. त्यामुळे त्याच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका करण्यात आली होती. दुसऱ्या सामन्यात विराट दुखापतीमुळे संघाबाहेर होता. त्यानंतर तिसऱ्या कसोटीत विराट फलंदाजीला येताच आफ्रिकन गोलंदाजांनी पुन्हा विराटला तशीच गोलंदाजी करायला सुरूवात केली. पण विराटने ऑफ स्टंप बाहेरील बरेचसे चेंडू सोडून दिले. त्यामुळे विराट चुकांमधून धडा घेत असल्याचं दिसलं, पण दुसऱ्या डावात मात्र पुन्हा विराटचं 'येरे माझ्या मागल्या' दिसून आले. एन्गीडीच्या गोलंदाजीवर ऑफ स्टंपपासून खूप बाहेर असलेल्या चेंडूवर फटका खेळताना विराट माघारी परतला. त्यामुळे अवघ्या २९ धावांवर विराट बाद झाला.
विराट कोहलीआधी अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारावरही चाहत्यांनी खूप टीका केली. शांत आणि संयमी खेळीची अपेक्षा असताना दोघेही स्वस्तात बाद झाले. पुजाराने ९ तर अजिंक्य रहाणेने अवघी एक धाव केली. हे दोघे बाद झाल्यावर चाहते त्यांच्यावर भलतेच नाराज झाले. अनेक फॅन्सनी ट्वीटरवरून या दोघांना निवृत्त होण्याचाही सल्ला दिला.