भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा कसोटी सामना रांची येथील जेएससीए आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम येथे सुरु आहे. या स्टेडियमला भारताचा माजी कर्णधार आणि येथील भूमीपूत्र महेंद्रसिंग धोनीचे नाव देण्यात यावे, असे मत भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी व्यक्त केले आहे.
झारखंड हे धोनीचे होम ग्राऊंड आहे. त्यामुळे येथील स्डेडियमला धोनीचे नाव द्यावे, असे चाहत्यांचेही मत आहे. अजून पर्यंत या स्टेडियमला कुणाचेही नाव देण्यात आलेले नाही. त्यामुळे या स्टेडियमला धोनीचे नाव देता येऊ शकते, असे म्हटले जात आहे.
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेच्या तिसऱ्या कसोटीचा पहिला दिवस हिटमॅन रोहित शर्मानं गाजवला. त्यानं खणखणीत शतकं झळकावून या मालिकेतील तिसऱ्या शतकाची नोंद केली. 3 बाद 39 अशा अडचणीत सापडलेल्या टीम इंडियाला त्यानं उपकर्णधार अजिंक्य रहाणेसह बाहेर आणले. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 166 धावांची भागीदारी करताना संघाला दोनशेपल्ल्याड पल्ला गाठून दिला. रोहितनं शतक झळकावून अनेक विक्रम मोडले. पण, त्यानं एका विश्विविक्रमालाही गवसणी घातली.
रोहितनं कसोटी क्रिकेटमध्ये 2000 धावांचा पल्ला पार केला. एका कसोटी मालिकेत तीन शतकं झळकावणारा रोहित हा दुसरा भारतीय सलामीवीर ठरला आहे. यापूर्वी सुनील गावस्कर यांनी तीन वेळा अशी कामगिरी केली आहे. यंदाच्या कॅलेंडर वर्षातील रोहितचे हे नववे आंतरराष्ट्रीय शतक ठरलं. त्यानं या कामगिरीसह सचिन तेंडुलकरच्या विक्रमाशी बरोबरी केली. तेंडुलकरने 1998 च्या कॅलेंडर वर्षात 9 शतकं झळकावली होती. त्यानंतर ग्रॅमी स्मिथ ( 2005) आणि डेव्हिड वॉर्नर ( 2016) यांनी कॅलेंडर वर्षात नऊ आंतरराष्ट्रीय शतकं ठोकली आहे. तेंडुलकरनंतर अशी कामगिरी करणारा रोहित पहिलाच भारतीय सलामीवीर ठरला.
या सह त्यानं वर्ल्ड रेकॉर्डचीही नोंद केली. त्यानं एका कसोटी मालिकेत सर्वात जास्त षटकार खेचण्याचा विक्रम नावावर केला. वेस्ट इंडिजच्या शिमरोन हेटमायरनं 2018 मध्ये बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत 15 षटकार खेचले होते. रोहितनं या मालिकेत आतापर्यंत 17 षटकार खेचले आहेत. या विक्रमात अव्वल पाचमध्ये वसमी राजा ( 14 वि. वेस्ट इंडिज 1977), अँण्ड्य्रु फ्लिंटॉफ ( 14 वि. दक्षिण आफ्रिका 2003) आणि मॅथ्यू हेडन ( 14 वि. झिम्बाब्वे 2003) यांचा समावेश आहे. भारताकडून एका मालिकेत सर्वाधित षटकारांचा विक्रम हरभजन सिंगच्या नावावर होता. त्यानं 2010मध्ये न्यूझीलंडविरुद्ध 14 षटकार खेचले होते.
रांचीतील तिसऱ्या कसोटी सामन्याबाबत पावसाचे अपडेट; उद्या किती षटकांचा सामना होणार...तिसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिला दिवशी पावसाने खोडा घातला. त्यामुळे पहिल्या दिवशी 58 षटकांचा खेळ झाला आणि 32 षटके वाया गेली. त्यामुळे आता दुसऱ्या दिवशीही पाऊस पडला तर किती षटके खेळवायची, हा प्रश्न बऱ्याच जणांपुढे असेल.
आता पहिल्या दिवशी वाया गेलेली 32 षटके कशी खेळवयाची, हा प्रश्न पंचांपुढे असेल. त्यामुळे उद्या सामना अर्धा तास लवकर सुरु करण्यात येणार आहे. पण जर दुसऱ्या दिवशीही पाऊस पडला आणि दिवसांतील 90 मधील काही षटके वाया गेली तर ती कधी खेळवायची, हादेखील मोठा प्रश्न आहे. रांचीमध्ये गेले काही दिवस पाऊस पडत आहे. त्यामुळे दुसऱ्या दिवशीही पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. पण पाऊस किती षटकांचा खेळ वाया करतो, हे पाहणे उत्सुकतेचे असेल.
मैदानात घुसलेल्या चाहत्याला सुरक्षारक्षकांनी धु धु धुतला...तिसऱ्या कसोटीचा पहिला दिवस हिटमॅन रोहित शर्मानं गाजवला. त्यानं खणखणीत शतकं झळकावून या मालिकेतील तिसऱ्या शतकाची नोंद केली. या सामन्यात एक चाहता आपल्या आवडत्या खेळाडूला भेटायला थेट मैदानात घुसला होता. पण या मैदानात घुसलेल्या चाहत्याला सुरक्षारक्षकांनी धु धु धुतल्याचे पाहायला मिळाले.
पुण्यातील सामन्यात एक चाहता असाच मैदानात घुसला होता. त्यावेळी भारताचा संघ क्षेत्ररक्षम करत होता. हा चाहता थेट धावत स्लीपमध्ये असलेल्या रोहित शर्माला भेटला. त्याने रोहितच्या पायावर लोटांगण घातले. रोहितसाठीही ही गोष्ट धक्कादायक होती. या भेटीमध्ये रोहित मैदानावर पडल्याचेही पाहिले गेले. त्यानंतर आता तिसऱ्या सामन्यात असाच प्रकार घडलेला पाहायला मिळत आहे.
रांचीतील तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताची प्रथम फलंदाजी होती. तर दक्षिण आफ्रिकेचा संघ क्षेत्ररक्षण करत होता. त्यावेळी एक चाहता थेट मैदानात घुसला. त्यावेळी तो धावत भारताच्या खेळाडू जवळ गेला नाही. तर या चाहत्याने दक्षिण आफ्रिकेच्या क्टिंटन डीकॉकला गाठले. या चाहत्याने त्याला मिठी मारली. त्यावेळी काही सुरक्षारक्षक मैदानात धावत आले आणि या चाहत्याला ताब्यात घेतले. या चाहत्याला ताब्यात घेतल्यावर त्याच्या दोन कानाखाली लगावण्यात आल्या. त्याचबरोबर त्याला चांगलाच चोप देण्यात आला.
सुरक्षारक्षकांनी चाहत्याला ताब्यात घेतल्यावर त्याला जो चोप दिला, यावर आता बरीच चर्चा होत आहे. तो चाहता मैदानात घुसला यामध्ये त्याची आणि सुरक्षारक्षकांचीही चूक होती. पण त्याला मैदानातून बाहेर काढताना त्याला असा चोप का दिला, यावर आता टीका होत आहे. या चाहत्याला जर काही शिक्षा केली असती दंड ठोठावला असता तर ते योग्य ठरले असते, पण या चाहत्याला एवढा चोप देणे किती योग्य आहे, अशी चर्चा सुरु आहे.