राजकोट :
खराब फॉर्मशी झुंज देत असलेला कर्णधार ऋषभ पंत याला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आज, शुक्रवारी येथे होणाऱ्या चौथ्या टी-२० सामन्यात दमदार कामगिरी करावी लागेल. भारतासाठी हा सामना ‘करा किंवा मरा’ असा असेल. विशाखापट्टनममधील तिसऱ्या सामन्यात पंत अपयशी ठरल्यानंतरही भारताने चुका सुधारून मोठा विजय साजरा केला होता. पाच सामन्यांच्या मालिकेत चुरस कायम राखण्यासाठी आणखी एका विजयाची गरज आहे. असे झाल्यास मालिकेचा फैसला अखेरच्या सामन्यात होईल.
पंत हा शानदार फलंदाज आहे. त्याच्यावर टीका झाल्यास तो उत्कृष्ट खेळ करीत टीकाकारांची तोंडे बंद करतो. चौथ्या सामन्यात त्याच्याकडून हीच अपेक्षा असेल. प्रतिस्पर्धी गोलंदाजांनी त्याला मनसोक्त फटकेबाजीपासून वंचित ठेवले. तो साधारणत: डीपमध्ये खराब फटका मारून झेलबाद होतो. या कमकुवतपणावर तोडगा काढावाच लागेल. मागच्या सामन्यात ऋतुराज गायकवाड आणि इशान किशन यांनी शानदार सुरुवात करून दिली होती. उर्वरित दोन सामन्यांतही त्यांच्याकडून अशी सुरुवात व्हावी, असे चाहत्यांना वाटते. आखूड टप्प्याचा चेंडू खेळण्यात अपयशी ठरत असलेला श्रेयस अय्यर याच्याकडून तिसऱ्या स्थानावर धावांची अपेक्षा बाळगता येईल. हार्दिकने मात्र २१ चेंडूंत नाबाद ३१ धावा वसूल करीत १८० पर्यंत पोहोचविले होते. मधल्या फळीला जबाबदारीने खेळणे गरजेचे आहे.
दुसरीकडे द. आफ्रिका संघ मागचा पराभव विसरून विजयपथावर परतण्यास उत्सुक असेल. मालिकेत त्यांच्याकडे २-१ ने आघाडी आहे. याच सामन्यात मालिकेचा निर्णय व्हावा, या निर्धारासह ते खेळतील. स्टार फलंदाज क्विंटन डिकॉकच्या मनगटाला दुखापत आहे. गोलंदाजीबाबत बोलायचे तर तबरेझ शम्सी आणि केशवर महाराज यांनी भरपूर धावा मोजल्या होत्या. वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा याने भेदक मारा केला. मात्र, दुसऱ्या टोकाहून त्याला साथ लाभली नव्हती. पाहुण्या संघाचे क्षेत्ररक्षणही सुमार होते.
गरबा नृत्याने खेळाडूंचे स्वागत कर्णधार ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली भारतीय टी-२० संघ आज राजकोटला पोहोचला. पारंपरिक गरबा नृत्याने भारतीय संघाचे स्वागत करण्यात आले. बीसीसीआयने ट्विटर हँडलवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये विशाखापट्टणम ते राजकोटपर्यंतच्या संपूर्ण प्रवासाची क्षणचित्रे दाखवण्यात आली आहेत. त्यात अर्शदीप सिंग थिरकताना दिसत आहे.
- अक्षर पटेल आणि युझवेंद्र चहल यांनी आपल्या फिरकीवर प्रतिस्पर्धी फलंदाजांना नाचविले होते. - वेगवान भुवनेश्वर कुमार हा देखील यशस्वी मारा करीत आहे. - आवेशने धावा दिल्या नाहीत; पण तो बळीदेखील घेऊ शकला नव्हता. - हर्षल पटेलने मात्र वैविध्यपूर्ण मारा करीत चार बळी घेतले.