सेंच्युरियन - भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना रविवारपासून खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघाची निवड करताना कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांना खूप विचार करावा लागण्याची शक्यता आहे. लोकेश राहुल, मयांक अग्रवाल, विराट कोहली, रिषभ पंत आणि जसप्रित बुमराह यांचे संघातील स्थान निश्चित आहे. तसेच फिरकीपटू रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी आणि चेतेश्वर पुजारा यांचाही अंतिम ११ खेळाडूंमधील समावेश होईल अशी शक्यता आहे. मात्र उर्वरित तीन स्थानांसाठी खेळाडूंची निवड करताना भारतीय संघव्यवस्थापनाचा कस लागणार आहे.
भारतीय संघाने गेल्या वर्षीच्या बॉक्सिंग डे पासून १५ कसोटी सामने खेळले आहेत. तसेच प्रत्येक वेळी अंतिम संघामध्ये ५ गोलंदाजांना संधी दिली आहे. यापैकी १३ सामन्यांमध्ये रवींद्र जडेजा किंवा वॉशिंग्टन सुंदर यांना अष्टपैलू खेळाडू म्हणून संघात स्थान देण्यात आले होते. मात्र दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी दोघांनाही संघात स्थान मिळालेले नाही, अशा परिस्थितीत रविचंद्रन अश्विनला सातव्या क्रमांकावर संधी मिळू शकते. दरम्यान, भारतीय संघ पाच गोलंदाजांसह खेळल्यास शार्दुल ठाकूरलाही संघात संधी मिळू शकते. शार्दुल ठाकूर आठव्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी सक्षम आहे.
भारतीय संघात ज्या तीन स्थानांसाठी चुरस आहे त्यामध्ये पाचव्या क्रमांकाच्या फलंदाजासाठी अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर आणि हनुमा विहारी यांच्यामध्ये चुरस आहे. अजिंक्य रहाणेचा फॉर्म तितकासा चांगला नसल्याने श्रेयस अय्यर आणि हनुमा विहारी यांच्यात चुरस आहे. त्यातही श्रेयस अय्यरला संधी मिळण्याची शक्यता अधिक आहे. तर सहाव्या क्रमांकासाठी रिषभ पंत याचं स्थान निश्चित आहे.
इशांत शर्मा आणि मोहम्मद सिराज यांच्यातील कुणा एका गोलंदाजाला अंतिम संघात संधी मिळू शकते. इशांत शर्माची गेल्या वर्षभरातील कामगिरी तितकीशी समाधानकारक झालेली नाही. त्याला ८ कसोटीत केवळ १४ विकेट्स मिळवता आल्या आहेत. तर मोहम्मद सिराजने मात्र वानखेडे कसोटीमध्ये त्याने भेदर मारा करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. तर तंदुरुस्त असल्यास मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह यांचा संगातील समावेश निश्चित आहे. अक्षर पटेल आणि रवींद्र जडेजा संघात नसल्याने अश्विनचे स्थान निश्चित आहे. तर शार्दुल ठाकूरच्या समावेशामुळे संघाची फलंदाजीही भक्कम होईल.
Web Title: India vs South Africa: Ajinkya Rahane or Shreyas Iyer, Mohmmad Siraj or Ishant Sharma? who will play in 1st Test, questions for Virat Kohli & Rahul Dravid
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.