कोरोनाचा परिणाम जगभरात आयोजित करण्यात येणाऱ्या अनेक क्रीडा स्पर्धांवरही झाला आहे. भारतातील लोकप्रिय लिग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आयपीएलचे आयोजन देखील पुढे ढकलण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे. यासोबतच आता भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिका देखील रद्द करण्यात आली आहे.
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या पहिल्या वन डे सामन्यात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने एकही चेंडू न खेळवता सामना रद्द करण्यात आला होता. या मालिकेतील दूसरा सामना 15 मार्चला लखनऊ आणि तिसरा वन डे सामना 18 मार्चला कोलकाता येथे रंगणार होता. तसेच हे दोन्ही सामने प्रेक्षकांविना खेळवण्याचा निर्णयही बीसीसीआयने घेतला होता. मात्र कोरोना व्हायरसचा प्रदूर्भाव पाहता आज मालिकेतील दोन्ही सामने रद्द करण्याचा निर्णय बीसीसीआयने जाहीर केला आहे.
दरम्यान, कोरोना व्हायरसमुळे आयपीएलचे आयोजन पुढे ढकलण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे. आयपीएल 2020ची स्पर्धा 29 मार्चपासून सुरुवात होणार होती. मात्र कोरोनामुळे दिल्ली सरकारने दिल्लीत एकही आयपीएलचे सामने न खेळवण्याचे जाहीर केले. यानंतर बीसीसीआयने आयपीएलचे सामने 29 मार्च ऐवजी 15 एप्रिलपासून खेळवणार असल्याचे जाहीर केले आहे. कोरोना व्हायरसचा धोका टाळण्यासाठी आम्ही आयपीएलचे आयोजन पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला असल्याचे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे.