नवी दिल्ली - भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दिल्लीमध्ये पहिला टी-२० सामना खेळवला जाणार आहे. यादरम्यान आफ्रिकी संघाच्या गोटातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज एडन मार्क्रम याला कोरोनाचा संसर्ग झाला आहे. मात्र या प्रकाराचा दोन्ही संघांमध्ये होत असलेल्या पहिल्या टी-२० सामन्यावर त्याचा परिणाम झालेला नाही.
क्रिकेट दक्षिण आफ्रिकेकडून याबाबत देण्यात आलेल्या माहितीनुसार सामन्यापूर्वी होणाऱ्या कोरोना टेस्टिंगच्या शेवटच्या टप्प्यात एडन मार्क्रम याला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे दिसून आले आहे. त्यानंतर त्याला क्वारेंटाइन करण्यात आले आहे.
बोर्डाकडून सांगण्यात आले की, एडन मार्क्रमची प्रकृती बरी आहे. तसेच उपचांराना त्याच्याकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. एडन मार्क्रम वगळता संघातील इतर खेळाडूंची चाचणी निगेटिव्ह आली आहे. अशा परिस्थितीत मार्क्रम कोरोना पॉझिटिव्ह सापडल्याचा दिल्लीतील टी-२० सामन्यावर कुठलाही परिणाम झालेला नाही.
आयपीएलचा हंगाम संपल्यानंतर काही दिवसांतच ही मालिका होत आहे. भारताचे अनेक स्टार क्रिकेटपटू आयपीएल संपल्यानंतर आपल्या घरी गेले होते. तर दक्षिण आफ्रिकेचे जे खेळाडू आयपीएलमध्ये खेळले होते, ते भारतातच थांबले होते.