राजकोट : ऋषभ पंतला विशिष्ट फटक्यांवर बाद होण्याची सवय टाळावी लागेल. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सध्याच्या मालिकेत तो ऑफ स्टम्पबाहेर जाणाऱ्या चेंडूवर वारंवार बाद झाला. असे बाद होणे चांगले संकेत नाहीत, या शब्दात माजी दिग्गज क्रिकेटर सुनील गावसकर यांनी ऋषभच्या खेळीवर आक्षेप नोंदविला.
४७ टी-२० त ७४० धावा काढणारा पंत नेहमी ऑफ स्टम्पबाहेर जाणाऱ्या चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या नादात स्वत:चा बळी देतो, असे आढळून आले. समालोचनादरम्यान गावसकर म्हणाले, ‘मागच्या तीन सामन्यात अशाप्रकारे बाद झाल्यानंतरही पंतने बोध घेतलेला नाही. प्रतिस्पर्धी गोलंदाज ऑफ स्टम्पबाहेर चेंडू टाकतात आणि पंत अलगदपणे त्यांच्या जाळ्यात अडकतो. अशा चेंडूवर हवेत फटके मारणे त्याने टाळायला हवे.’
द. आफ्रिकेच्या गोलंदाजांनी पंतविरुद्ध विशेष रणनीती आखल्याचे सांगून गावसकर पुढे म्हणाले, ‘ऑफस्टम्पबाहेर चेंडू टाका आणि पंतला बाद करा,’ असा त्यांचा अजेंडा आहे. पंतने या मालिकेत २९, ५, ६ आणि १७ धावा केल्या. यंदा टी-२० सामन्यात पंत किमान दहावेळा अशा पद्धतीने बाद झाला. त्याने असे चेंडू छेडले नसते तर त्यातील काही चेंडू वाईड ठरले असते.
चेंडू फार बाहेर असल्याने तो टोलवायला अतिरिक्त ताकद लागते. भारतीय कर्णधार एका मालिकेत सातत्याने एकसारखा बाद होत असेल तर हे चांगले संकेत ठरणार नाहीत.’
निवडीसाठी नाव नव्हे कामगिरीचा विचार...
‘टी-२० विश्वचषकासाठी जाहीर होणाऱ्या संघात दिनेश कार्तिक फिट बसत नाही,’या गौतम गंभीरच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेत गावसकर म्हणाले, ‘संघ निवडीच्या वेळी नाव नव्हे तर कामगिरीचाच विचार होतो. अंतिम एकादशमध्ये कार्तिकला स्थान मिळणार नसेल तर संघात त्याची निवड करण्यात अर्थ नाही, असे गंभीरचे मत होते. या वक्तव्याशी सहमत नसलेले गावसकर पुढे म्हणाले, ‘कार्तिक संघात असावा, असे प्रत्येक सदस्याला वाटते. कार्तिकच्या वयाकडे पाहू नका. कठीण परिस्थितीत, कमी चेंडू वाट्याला येत असताना आणि अत्यंत दडपणात खेळून तो किती प्रभावीपणे धावा काढतो, हे पाहा. माझ्या मते तो टी-२० च नव्हे तर वन-डे विश्वचषकाच्या संघातही असायला हवा.’
Web Title: India vs South Africa: '' Falling out is not a good sign '', Sunil Gavaskar Criticize Rishabh Pant, gives special advice
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.