सेंच्युरियन - पहिल्या एकदिवसीय सामन्यानंतर दुस-या सामन्यातही दक्षिण आफ्रिकेचे फलंदाज भारताची स्पिनर जोडी कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहलचा सामना करु शकले नाहीत. दोघांनी रविवारी सुपरस्पोर्ट पार्क मैदानात झालेल्या दुस-या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना मैदानावर टिकू दिलं नाही आणि 32.2 षटकांमध्येच फक्त 118 धावांवर संपुर्ण संघाला तंबूत माघारी धाडलं. दक्षिण आफ्रिकेने ठेवलेलं हे सोप्पं आव्हान विराट कोहली (नाबाद 46) आणि शिखर धवनने (नाबाद 51) 20.3 षटकांमध्येच पुर्ण केलं. जेव्हा भारतीय संघ क्षेत्ररक्षण करत होता तेव्हा विराट कोहली बाऊंड्री लाइनवर उभा होता. त्यावेळी त्याच्यामागे काही भारतीय चाहते हातात पोस्टर घेऊन उभे होते. या पोस्टरवर विराट कोहली आणि अनुष्का शर्माचा फोटो होता आणि 'शादी मुबारक' असं लिहिण्यात आलं होतं. हे चाहते विराट कोहलीला लग्नाच्या शुभेच्छा देत चिअर करत होते. यावेळी विराट कोहलीने चाहत्यांना हात दाखवत शुभेच्छा स्विकारल्या. यानंतर चाहते अजून जोरजोरात चिअर करु लागले.
दुस-या एकदिवसीय सामन्यात भारतीय गोलंदाजीसमोर दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांचा दाणादाण उडाली. सेंच्युरियन येथे झालेल्या सामन्यात भारतानं दक्षिण आफ्रिकेचा नऊ विकेटनं पराभव केला. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करताना भारतीय फिरकी गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांचा 118 धावांत खुर्दा केला. त्यानंतर फलंदाजी करताना कोहली-धवनने संयमी फलंदाजी करत भारताला विराट विजय मिळवून दिला. सलामिवीर रोहित शर्मा 15 धावांवर बाद झाला. त्यानंतर कोहली आणि शिखरनं दुसऱ्या विकेटसाठी 93 धावांची भागिदारी करत भारताला एकहाती विजय मिळवून दिला. धवनने अर्धशतक करत विजयात मोलाचा वाटा उचलला. विराट कोहलीनं 43 धावांची नाबाद खेळी केली. या विजयासह भारतानं सहा एकदिवसीय सामन्याच्या मालिकेत 2-0ने आघाडी घेतली आहे.
दरम्यान, दक्षिण आफ्रिकेनं प्रथम फलंदाजी करताना भारतीय फिरकीसमोर सपशेल लोटांगण घेतलं. यजुवेंद्र चहल आणि कुलदीपनं आफ्रिकेच्या फलंदाजांची दाणादाण उडवली. चहल-कुलदीप या फिरकी जोडीनं आफ्रिकेच्या आठ फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. चहलनं पाच तर कुलदीपनं तीन विकेट घेतल्या. फिरकी माऱ्यापुढे खेळताना आफ्रिकेच्या फलंदाजांनी नांग्या टाकल्याचे पहायला मिळाले. युझवेंद्र चहल वनडे सामन्यात सेंच्युरियन मैदानात 5 विकेट घेणारा पहिला खेळाडू ठरला. भुवनेश्वर आणि बुमराहनं प्रत्येकी एक-एक विकेट घेतली. आफ्रिकेच्या सहा फलंदाजांना दोन आकडी धावसंख्याही पार करता आली नाही. 32.2 षटकांत दक्षिण आफ्रिकेचा डाव 118 धावांत संपुष्टात आला.
दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. भारतीय गोलंदाजांनी कर्णधाराचा हा निर्णय सार्थ ठरवत 118 धावांमध्ये आफ्रिकेचा खुर्दा उडवला. भारतीय गोलंदाजांनी टिच्चून मारा करत आफ्रिकेला सुरुवातीच्या षटकांत चार झटके दिले. त्यांच्या 4 विकेट्स केवळ 14 षटकांत गेल्या होत्या. त्यावेळी धावफलकावर केवळ 53 धावाच होत्या. झोंडो (25), जेपी ड्युमिनी(25), मॉरीस (14), हाशिम अमला (23), डिकॉक (20),कर्णधार एडिन मार्करम (8) आणि डेविड मिलर (0) यांना आपल्या लौकीकास साजेशा खेळ करता आला नाही. कुलदीप यादवने एडिन मार्करम आणि डेविड मिलरला बाद केले तर भुवनेश्वर कुमारने हाशिम अमला (२३) तर युझवेन्द्र चहलने डिकॉकला (२०) बाद करत आफ्रिकेला अडचणीत टाकले होते.