सेंच्युरियन - येथे झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतानं दक्षिण आफ्रिकेचा नऊ विकेटनं पराभव केला. या विजयासाह भारतानं मालिकेत 2-0 ने आघाडी घेतली. या विजयात महत्वाची भुमिका बजावणाऱ्या चहलच्या नावे एका खास विक्रमाची नोंद झाली आहे. युझवेन्द्र चहल हा दक्षिण आफ्रिकेत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पाच विकेट घेणारा पहिला फिरकी गोलंदाज ठरला आहे. याबरोबरच युझवेन्द्र चहलची 22 धावांत 5 बळी ही वनडेत वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरीही झाली आहे. युझवेन्द्र चहलची आजची कामगिरी ही दक्षिण आफ्रिकेतील फिरकी गोलंदाजांची दुसरी सर्वोत्तम कामगिरी. आफ्रिकेच्या निकी बोयेने 21 धावा देत 5 विकेट्स घेतल्या होत्या. निकी बोयेनेच्या विक्रमाची चहलनं आज बरोबरी केली आहे. त्याचप्रमाणे वसिम अक्रमनंतर वन-डेत आफ्रिकेविरोधात चहलची ही दुसऱ्या क्रमांकाची कामगिरी आहे. यापूर्वी वासिम अक्रम यांनी 16 धावा देत 5 विकेट्स घेतल्या होत्या. 118 ही दक्षिण आफ्रिकेची वनडेतील दक्षिण आफ्रिकेतील सर्वात नीचांकी धावसंख्या आहे. यापूर्वी ते इंग्लंडविरुद्ध 2009 मध्ये 119 धावांवर बाद झाले होते.
दरम्यान, दुसऱ्या वनडेत दक्षिण आफ्रिकेनं प्रथम फलंदाजी करताना भारतीय फिरकीसमोर सपशेल लोटांगण घेतलं. यजुवेंद्र चहल आणि कुलदीपनं आफ्रिकेच्या फलंदाजांची दाणादाण उडवली. चहल-कुलदीप या फिरकी जोडीनं आफ्रिकेच्या आठ फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. चहलनं पाच तर कुलदीपनं तीन विकेट घेतल्या. फिरकी माऱ्यापुढे खेळताना आफ्रिकेच्या फलंदाजांनी नांग्या टाकल्याचे पहायला मिळाले. युझवेंद्र चहल वनडे सामन्यात सेंच्युरियन मैदानात 5 विकेट घेणारा पहिला खेळाडू ठरला. भुवनेश्वर आणि बुमराहनं प्रत्येकी एक-एक विकेट घेतली. आफ्रिकेच्या सहा फलंदाजांना दोन आकडी धावसंख्याही पार करता आली नाही. 32.2 षटकांत दक्षिण आफ्रिकेचा डाव 118 धावांत संपुष्टात आला. त्यानंतर फलंदाजी करताना कोहली-धवनने संयमी फलंदाजी करत भारताला विराट विजय मिळवून दिला. सलामिवीर रोहित शर्मा 15 धावांवर बाद झाला. त्यानंतर कोहली आणि शिखरनं दुसऱ्या विकेटसाठी 93 धावांची भागिदारी करत भारताला एकहाती विजय मिळवून दिला. धवनने अर्धशतक करत विजयात मोलाचा वाटा उचलला. विराट कोहलीनं 43 धावांची नाबाद खेळी केली. या विजयासह भारतानं सहा एकदिवसीय सामन्याच्या मालिकेत 2-0ने आघाडी घेतली आहे.