जोहान्सबर्ग - गेल्यावर्षभरात भारतीय उपखंडात वर्चस्व गाजविणा-या विराटसेनेला द. आफ्रिकेविरोधातील पहिल्या दोन कसोटी सामन्यात पराभवाचे तोंड पहावे लागले. या दोन्ही पराभवामुळे तीन कसोटी सामन्याची मालिकाही गमावली. त्यानंतर विराट कोहलीच्या संघ निवडीवर भारतातील माजी क्रिकेटरनी तोंडसुख घेतले. त्यात आता विदेशी खेळाडूचीही भर पडली आहे. दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रॅम स्मिथनेही विराट कोहलीच्या क्षमतांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. कोहली जास्त दिवस कर्णधारपदावर राहणार नाही, अशी शक्यता स्मिथने व्यक्त केली आहे. तसेच कोहलीला नवीन संकल्पना सुचवणारा आणि एक सर्वोत्तम लिडरशीपसाठी मदत करणाऱ्या जोडीदाराची आवश्यकता आहे, असेही स्मिथ म्हणाला.
विराट कोहली सर्वोत्तम खेळाडू आहे आणि त्याच्याकडे सर्वोत्तम बनण्याची क्षमताही आहे. कोहलीला त्याचा खेळ कसा असावा हे माहीत आहे. मैदानावरही तो सर्वोत्तम कामगिरी करतोय, मात्र त्याला मैदानावरील व्यूहरचना समजावण्यासाठी आणि नवीन संकल्पना सुचवणारा जोडीदार हवा आहे. तोच त्याचे डोळे उघडू शकतो. अन्यथा कोहली जास्त दिवस कर्णधारपदावर टीकणार नाही, अशी शक्यता स्मिथने व्यक्त केली. तसेच कोहली एक चांगला फलंदाज आहे. त्याच्या मैदानावरील आक्रमकतेमुळे त्याचा वैयक्तीक खेळ बहरत आहे मात्र त्याच्या अति आक्रमकतेमुळे संघाचे नुकसान होत आहे. कोहली इतका पॉवरफूल झाला आहे की त्याच्या आजूबाजूला असणाऱ्या खेळाडूंना त्याच्यापर्यंत पोहोचण्यास संघर्ष करावा लागत आहे, असेही स्मिथ म्हणाला.
टीम इंडियाने शाळकरी मुलांसारख्या चूका केल्या - रवी शास्त्री
पहिल्या दोन कसोटी सामन्यात भारतीय संघाने शाळकरी मुलांप्रमाणे चूका केल्या. भारतीय संघाने अशा चूका टाळल्या पाहिजेत असे मत टीम इंडियाचे कोच रवी शास्त्री यांनी व्यक्त केले. दुस-या कसोटीत भारताचे तीन फलंदाज रनआऊट झाले होते. त्या अनुषंगाने शास्त्री यांनी हे विधान केले. केप टाऊन आणि पाठोपाठ सेंच्युरियन कसोटीतील पराभवामुळे भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका आधीच गमावली आहे. दक्षिण आफ्रिकेचा संघ 2-0 असा विजयी आघाडीवर आहे.
महेंद्रसिंग धोनीकडून विराटची पाठराखण
माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने द. आफ्रिका दौ-यातील ढिसाळ कामगिरीबद्दल सध्याचा कर्णधार विराट कोहलीवर होत असलेला टीकेचा भडीमार योग्य नसल्याचे सांगून विराटची पाठराखण केली आहे. आमचा संघ २० बळी घेत असून संघाचे जे सकारात्मक पैलू आहेत त्यात गोलंदाजांची कामगिरी प्रमुख असल्याचे धोनीने सांगितले.
कसोटी मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना 24 जानेवारीपासून सुरु होणार आहे. या सामन्यात अजिंक्य रहाणेला संधी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.