भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या तीन सामन्यांच्या वन डे मालिकेसाठी टीम इंडियाची आज निवड होणार आहे. या मालिकेसाठी निवडण्यात येणाऱ्या संघात बरेच बदल पाहायला मिळण्याची शक्यता आहे. विराट कोहलीला विश्रांती दिली जाऊ शकते, त्याच्या अनुपस्थितीत संघाचे कर्णधारपद कोणाला जाते याची उत्सुकता आहे. पण, सर्वांचे लक्ष लागले आहे ते हार्दिक पांड्याच्या पुनरागमनाकडे.
दुखापतीतून सावरताना पांड्याने स्थानिक ट्वेंटी-२० मालिकेत दोन वादळी शतकांसह ३४७ धावा कुटल्या. हार्दिकचे न्यूझीलंड दौऱ्यातून पुनरागमन अपेक्षित होते, परंतु तो स्वतः त्याच्या तंदुरुस्तीवर समाधानी नव्हता. म्हणून त्याने माघार घेतली. आता ट्वेंटी-२० स्पर्धेतून त्याने त्याची तंदुरुस्ती सिद्ध केली आहे. त्यामुळे आफ्रिकाविरुद्ध त्याचे टीम इंडियात पुनरागमन पक्के समजले जात आहे.
केदार जाधवच्या कारकिर्दीला धोका..केदार जाधवला या मालिकेत डच्चू दिला जाऊ शकतो. असे झाल्यास सूर्यकुमार यादवला संधी मिळू शकते. ३५ वर्षीय केदारचे यानंतर वन डे संघातील स्थान कायमचे गेल्यात जमा होण्याची शक्यता आहे. त्याला पर्याय म्हणून टीम व्यवस्थापनाकडे अनेक सक्षम पर्याय आहेत.
रोहितची अनुपस्थिती अन् विराटला विश्रांती न्यूझीलंड दौऱ्यात दुखापतग्रस्थ झालेला रोहित शर्मा आफ्रिकेविरुद्ध खेळण्याची शक्यता कमी आहे. तो थेट आयपीएलसाठी मैदानावर उतरेल. कामाका लोड पाहता विराटला या मालिकेत विश्रांती देण्याची शक्यता आहे.
कर्णधार कोण?विराट व रोहितच्या अनुपस्थितीत संघातील वरिष्ठ खेळाडू म्हणून शिखर धवनला कर्णधार बनवले जाऊ शकत. या शर्यतीत लोकेश राहुलही आहे.