Hardik Pandya IND vs SA T20: टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दमदार पुनरागमन केले. हार्दिकने गुरुवारी (९ जून) दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात १२ चेंडूत ३१ धावांची तुफानी खेळी केली. यापूर्वी हार्दिकने त्याच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्ससाठी IPL 2022 मध्ये उत्कृष्ट खेळ दाखवत विजेतेपद पटकावले होते. हार्दिक पांड्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध धडाकेबाज खेळी केल्यानंतर BCCIला विशेष मुलाखत दिली. त्यात बोलताना, 'प्रामाणिकपणे कठोर परिश्रम करण्यावर माझा विश्वास आहे आणि पुनरागमनाच्या या प्रवासात खूप त्याग केला आहे', असे मत त्याने मांडले.
"माझ्या टीम इंडियातील पुनरागमनाबाबत अनेक गोष्टी बोलल्या गेल्या. पण मला स्वतःला उत्तर द्यायचं होतं. मी सकाळी ५ वाजता उठून ट्रेनिंग करायचो. पुरेशी विश्रांती मिळावी म्हणून त्यानंतर थेट दुपारी ४ वाजता मैदानात जायचो. या ४ महिन्यांत मी रात्री साडेनऊला झोपायचो. मी या प्रक्रियेत खूप त्याग केला. माझ्यासाठी ही लढाई कठीण होती. पण मी आयपीएल खेळण्यापूर्वी ही लढाई लढली आणि त्याचा निकाल उत्कृष्ट पद्धतीने दिसल्यामुळे मी समाधानी आहे", असे तो म्हणाला.
"मला माहित आहे की मी अशा प्रकारचे कठोर परिश्रम केले होते. माझ्या आयुष्यात मी नेहमीच कठोर परिश्रम केले आहेत पण मी त्यानंतरच्या परिणामांची कधीही चिंता केली नाही. मी खरोखर कठोर आणि प्रामाणिकपणे काम केले आहे. पण हे सारं सवयीचंच असल्यामुळे मी काही विशेष करत असताना फार उत्साही होत नाही", असेही हार्दिक पांड्या म्हणाला.