मुंबई, भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( बीसीसीआय) गुरुवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा केली. बीसीसीआयनं फॉर्मात नसलेल्या लोकेश राहुलला घरचा रस्ता दाखवताना युवा फलंदाज शुबमन गिलला कसोटी पदार्पणाची संधी दिली आहे. राहुलला वगळल्यानं हिटमॅन रोहित शर्माचा कसोटीत सलामीला खेळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. निवड समिती प्रमुख एमएसके प्रसाद यांनीही गुरुवारी तसे स्पष्ट केले.
वेस्ट इंडिज दौऱ्यावर रोहितचा कसोटी संघात समावेश करण्यात आला होता. मात्र, त्याला दोन्ही कसोटीत अंतिम अकरात संधी देण्यात आली नाही. या मालिकेत सलामीवीर म्हणून लोकेश राहुल आणि मयांक अग्रवाल यांनी जबाबदारी पार पाडली. पण, त्याला 4 डावांत केवळ 101 धावा करता आल्या. अग्रवालनेही साजेशी कामगिरी केली नाही, परंतु राहुलच्या तुलनेत त्याला कमी संधी मिळाली आहे. राहुलला मागील 12 डावांत एकच अर्धशतक झळकावता आहे. खराब फॉर्मात असलेल्या राहुलला डच्चू दिल्यानंतर रोहितचा सलामीला खेळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
दरम्यान, एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीती प्रसाद यांनी सांगितले की,''वेस्ट इंडिज दौऱ्यानंतर निवड समिती सदस्यांची अद्याप बैठक झालेली नाही. पण, जेव्हा ती होईल, त्यावेळी रोहितचा कसोटीतही सलामीवीर म्हणून विचार केला जावा, या विषयावर चर्चा नक्की केली जाईल. राहुलकडे प्रतीभा आहे, परंतु सध्या तो चांगल्या फॉर्मात नाही. त्याच्या फॉर्माची आम्हालाही तितकीच चिंता आहे. त्याला लवकरच फॉर्म परत मिळवावा लागेल.''
हेच मत प्रसाद यांनी गुरुवारी व्यक्त केले. ते म्हणाले,'' रोहित शर्माला कसोटीत सलामीला खेळण्याची संधी आम्हाला द्यायची आहे.'' रोहितने 27 कसोटी सामन्यांत 39.62 च्या सरासरीनं 1585 धावा केल्या आहेत. त्यात तीन शतकं व 10 अर्धशतकांचा समावेश आहे. पण, त्याने एकदाही कसोटीत ओपनिंग केली नाही.
Web Title: India vs South Africa: Hitman Rohit Sharma to open Test against south africa
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.