विशाखापट्टणम : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध बुधवारपासून सुरु होत असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघ ‘हिटमॅन’ रोहित शर्माकडून मोठी अपेक्षा ठेवेल. सलामीवीर म्हणून आपला फॉर्म कसोटी क्रिकेटमध्येही कायम ठेवावा, अशीच त्याच्याकडून आशा असेल. कसोटी मालिकेपूर्वी रोहितला सलामीवीर फलंदाज म्हणून संधी देण्याचा प्रयोग विशेष यशस्वी ठरला नाही. मालिकेपूर्वी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकमेव सराव सामन्यात डावाची सुरुवात करताना रोहितला खातेही उघडता आले नव्हते.
रोहितचा शानदार फॉर्म बघता युवराज सिंगसह अनेक माजी क्रिकेटपटूंनी मुंबईच्या या फलंदाजाने सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये खेळायला हवे, असे मत व्यक्त केले आहे. त्याला कसोटी क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून अधिक संधी मिळायला हव्या, असेही मत व्यक्त करण्यात आले. रोहितने आतापर्यंत २७ कसोटी सामन्यात ३९.६२ च्या सरासरीने १५८५ धावा केल्या असून मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर १० हजाराहून अधिक धावांची नोंद आहे.
या व्यतिरिक्त भारतातर्फे यष्टिरक्षण कोण करणार, यावरही सर्वांची नजर राहील. फलंदाजीमध्ये कामगिरीत सातत्य न राखल्यानंतरही पंत तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये पहिली पसंती आहे, पण फिटनेस सिद्ध करणारा साहा त्याचे स्थान घेण्यास सज्ज असून त्याला संधी मिळणार असल्याचे निश्चित आहे.
उर्वरित संघ जवळजवळ निश्चित आहे. भारत या लढतीत दोन वेगवान गोलंदाज व दोन फिरकीपटूंसह खेळू शकतो. खेळपट्टी फिरकीला अनुकूल ठरल्यास हनुमा विहारी तिसऱ्या फिरकीपटूची भूमिका बजावू शकतो.
बुमराहच्या अनुपस्थितीत इशांत शर्मा व मोहम्मद शमीची जोडी वर्चस्व गाजवण्यास सक्षम आहे. विंडीजविरुद्ध अंतिम ११ खेळाडूंत रवींद्र जडेजा हा एकमेव फिरकीपटू होता. त्यामुळे अश्विन व कुलदीप यादव यांच्यापैकी त्याच्यासोबत कोण असेल, याबाबत उत्सुकता आहे.
दक्षिण आफ्रिका संघ यावेळी भारत दौºयावर काही युवा खेळाडूंसह आला आहे. कर्णधार फाफ डूप्लेसिससह सध्याच्या संघातील केवळ ५ खेळाडू गेल्यावेळी भारत दौºयावर आले होते. त्यावेळी त्यांना कसोटी मालिकेत ०-३ ने पराभव स्वीकारावा लागला होता. सराव सामन्यात एडन मार्कराम व तेंबा बावुमा यांनी छाप पाडली. त्यामुळे कसोटी मालिकेपूर्वी त्यांचा आत्मविश्वास उंचावलेला आहे.
कागिसो रबादा, वर्नन फिलँडर व लुंगी एनगिडी हे वेगवान गोलंदाजांचे त्रिकूट भारतीय फलंदाजांवर वर्चस्व गाजवू शकते. विशेषता कसोटी सामन्यादरम्यान पाच दिवस ढगाळ वातावरण व पाऊस येण्याची शक्यता वर्तविण्यात आल्यामुळे परिस्थिती वेगवान गोलंदाजांसाठी अनुकूल ठरण्याची शक्यता आहे. भारतीय संघ मायदेशात विक्रमी सलग ११ वी कसोटी मालिका जिंकण्याच्या निर्धाराने उतरणार आहे. (वृत्तसंस्था)
भारत : विराट कोहली (कर्णधार), मयंक अग्रवाल, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, रिषभ पंत, रिद्धिमान साहा, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, उमेश यादव, इशांत शर्मा आणि शुभमन गिल.
दक्षिण आफ्रिका : फाफ डु प्लेसिस (कर्णधार), तेम्बा बावुमा, थ्युनिस डी ब्रुयिन, क्विंटन डिकाक, डीन एल्गर, जुबेर हमजा, केशव महाराज, एडन मार्कराम, सेनुरन मुथुसामी, लुंगी एनगिडी, एरिक नॉर्टजे, वरनन फिलँडर, डेन पीट, कागिसो रबादा आणि रूडी सेकेंड.
Web Title: India vs South Africa: India Vs South Africa 1st test will be start from today
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.