भारतीय महिला संघाने तिसऱ्या वन डे सामन्यात दक्षिण आफ्रिका महिला संघासमोर शरणागती पत्करली. पहिले दोन सामने सहज खिशात घालणाऱ्या भारतीय संघाला तिसऱ्या व अखेरच्या सामन्यात जेमतेम 146 धावा करता आल्या. हरमनप्रीत कौर आणि शिखा पांडे यांनी तळाला दमदार फलंदाजी करताना भारताला 6 बाद 71वरून समाधानकारक पल्ला गाठून दिला.
हरमनप्रीत कौर हिच्यावर सर्व मदार होती. पण, तिला अन्य कोणाकडून साथ मिळाली नाही. दिप्ती शर्मा, तानिया भाटिया याही लगेच माघारी परतल्या. कौर एका बाजूनं खिंड लढवत होती. कौरला शिखा पांडेनं चांगली साथ दिली. दोघींनी सातव्या विकेटसाठी 49 धावांची भागीदारी केली. कौरनं 76 चेंडूंत 5 चौकारांसह 38 धावा केल्या. पांडेनं 40 चेंडूंत 6 चौकारांसह 35 धावा केल्या. आफ्रिकेच्या कॅपनं सर्वाधिक तीन विकेट घेतल्या, तर इस्मैल व अयाबोंगा खाका यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.