जोहान्सबर्ग - भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये तिस-या कसोटी सामन्याला सुरुवात झाली आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणा-या भारताला सुरुवातीलाच पहिला झटका बसला आहे. सलामीवीर लोकेश राहुलला भोपळाही फोडू न देता फिलँडरने यष्टीरक्षक डी कॉककरवी झेलबाद केले.
तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत सलग दोन पराभवांमुळे भारताने आधीच कसोटी मालिका गमावली आहे. तिस-या कसोटीत प्रतिष्ठा राखण्यासाठी भारताला विजय आवश्यक आहे. या कसोटीत भारताने दोन बदल केले आहेत.
दक्षिण आफ्रिका दौ-यात सातत्याने अपयशी ठरलेल्या रोहित शर्माच्या जागी अजिंक्य रहाणेला संधी दिली आहे तसेच फिरकी गोलंदाज अश्विनच्या जागी भुवनेश्वर कुमारला स्थान देण्यात आले आहे. जसप्रीत बुमराहच्या जागी भुवनेश्वरला संधी मिळेल अशी शक्यता होती. पण विराटने अश्विनला वगळण्याचा निर्णय घेतला.
याआधी दोन कसोटीतील संघ निवड वादाच्या भोव-यात सापडली होती. अजिंक्य रहाणेला राखीव खेळाडूंमध्ये बसवून ठेवल्यामुळे विराटवर चौफेर टीका झाली. कारण परदेशात अजिंक्यची कामगिरी उत्तम राहिली आहे.