Join us  

India vs South Africa : दुष्काळात तेरावा महिना; आफ्रिकेच्या मुख्य खेळाडूची मालिकेतून माघार

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका : भारताने दुसऱ्या कसोटीतही विजय मिळवून मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2019 9:19 AM

Open in App

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका : भारताच्या पहिल्या डावातील 601 धावांचा पाठलाग करण्यात दक्षिण आफ्रिकेला दोन्ही डावांत अपयश आलं. आफ्रिकेचा पहिला डाव 275 धावांत गुंडाळल्यानंतर कर्णधार विराट कोहलीनं पाहुण्यांवर फॉलोऑन लादला. दुसऱ्या डावातही आफ्रिकेला 189 धावाच करता आल्या. भारतानं हा सामना एक डाव व 137 धावांनी जिंकला. या विजयासह भारताने तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. या मानहानिकारक पराभवानंतर आफ्रिकेची चिंता वाढवणारी बातमी सामन्यानंतर धडकली आहे. त्यांच्या मुख्य खेळाडूनं तिसऱ्या कसोटीतून माघार घेतली आहे.

आफ्रिकेचा फिरकीपटू केशव महाराजनं खांद्याच्या दुखापतीमुळे तिसऱ्या आणि शेवटच्या कसोटीतून माघार घेतली आहे. क्रिकेट दक्षिण आफ्रिकेनंही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. महाराजची माघार ही आफ्रिकेसाठी मोठा धक्काच आहे. दुसऱ्या कसोटीत क्षेत्ररक्षण करताना महाराजला दुखापत झाली. महाराजनं गोलंदाजीत फार योगदान दिले नसले तरी फलंदाजीत त्यानं दुसरी कसोटी गाजवली. त्यानं पहिल्या डावात 132 चेंडूंत 72 धावा केल्या. याखेळीसह त्यानं वेर्नोन फिलेंडरसह ( 44) नवव्या विकेटसाठी 109 धावांची विक्रमी भागीदारीही केली.  दुसऱ्या डावातही महाराजनं 65 चेंडूंत 22 धावा केल्या आणि पुन्हा फिलेंडरसह 56 धावा जोडल्या. गोलंदाजीत त्यानं 50 षटकांत 196 धावा देत केवळ एक विकेट घेतली. 

''MRI रिपोर्टनुसार महाराजच्या डाव्या खांद्याचे स्नायू दुखावले गेले आहेत आणि त्यामुळे त्याला फलंदाजी करताना त्रास होत होता. गोलंदाजीतही त्याला हवी तशी कामगिरी करता आली नाही. त्याला 14 ते 21 दिवसांच्या विश्रांतीची गरज आहे. त्यानंतर तो पुन्हा क्रिकेटमध्ये पुनरागमन करेल,''अशी माहिती दक्षिण आफ्रिका संघाचे डॉक्टर रामजी हशेंद्र यांनी दिली. 

महाराजच्या जागी संघात जॉर्ज लिंडे याचा समावेश करण्याता आला आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरी कसोटी 19 ऑक्टोबरपासून रांची येथे खेळवण्यात येणार आहे. 

 

टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाविराट कोहलीमयांक अग्रवाल