India vs South Africa : दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठीच्या कसोटी संघाची घोषणा करताना बीसीसीआयनं अजिंक्य रहाणेकडून उप कर्णधारपदाची जबाबदारी काढून ती रोहित शर्माच्या खांद्यावर सोपवली. अजिंक्य रहाणेचा फॉर्म पाहता त्याचे प्लेइंग इलेव्हनमधील स्थानही धोक्यात आहे, असे असताना त्याच्याकडे उप कर्णधारपद कायम ठेवणे हे BCCIला योग्य वाटले नाही आणि त्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला. पण, विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या कसोटी मालिकेपूर्वी रोहितला दुखापत झाली आणि त्यानं माघार घेतली. BCCIनं रोहितच्या माघारीची घोषणा करताना उप कर्णधारपदी कोणाचेच नाव जाहीर केले नव्हते, पण आता विराटच्या लाडक्या खेळाडूची या पदावर वर्णी लागण्याची शक्यता आहे.
भारतीय संघ १६ डिसेंबरला जोहान्सबर्गसाठी रवाना होणार आहे. तीन कसोटी सामन्यांच्या या मालिकेला २६ डिसेंबरपासून सुरूवात होणार आहे. भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात आतापर्यंत ३९ कसोटी सामने झाले आणि त्यात आफ्रिकेनं १५, तर भारतानं १४ विजय मिळवले. १० सामने ड्रॉ राहिले. त्यामुळे भारतीय संघ या दौऱ्यावर या आकडेवारीत आघाडी घेण्याच्या प्रयत्नात असेल. भारताच्या तुलनेत आफ्रिकेचा संघ कागदावर कमकुवत दिसत आहे आणि अशात भारताला आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकण्याची आयती संधी आहे. पण, रोहितच्या माघारीमुळे संघाला किंचित फटका बसू शकतो.
रोहितच्या अनुपस्थितीत BCCIनं उप कर्णधारपद रिक्त ठेवले असले तरी त्या पदावर लोकेश राहुल ( KL Rahul) याच्या नावाची लवकरच घोषणा होऊ शकते. लोकेश हा मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये टीम इंडियाचा उप कर्णधार आहे. TOIनं दिलेल्या वृत्तानुसार रोहितच्या अनुपस्थितीत उप कर्णधारपदावर लोकेश राहुलच्या नावाची घोषणा होऊ शकते. अजिंक्य रहाणे फॉर्मात नाही आणि त्यामुळे त्याच्याकडून हे पद काढून घेतले गेले. त्यात रोहितनं माघार घेतल्यानं अजिंक्यकडे पुन्हा ही जबाबदारी देण्यास BCCI उत्सुक नाही.
'' मागे वळून पाहण्यात काहीच अर्थ नाही. सध्याच्या घडीला लोकेश राहुल हा पर्याय समोर आहे. खराब कामगिरीमुळे रहाणेचे अंतिम ११मधील स्थानही धोक्यात आहे. संघात आर अश्विन हा अनुभवी खेळाडू आहे, परंतु संघ व्यवस्थापन त्याला खेळवणार की नाही, यात शंक आहे. अशा परिस्थिती उप कर्णधार कोणाला करायचे हे खरे आव्हान आहे. येत्या एक दोन दिवसांत त्याची घोषणा होईल,''असे बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले. जसप्रीत बुमराह याच्या नावाचाही या पदासाठी विचार केला गेला. पण, निवड समितीला आता युवा खेळाडूंकडे जबाबदारी सोपवायची आहे आणि त्यांना तयार करायचे आहे.
रोहित शर्माच्या जागी प्रियांक पांचाळची निवड करण्यात आली आहे. पांचाळकडे १०० प्रथम श्रेणी क्रिकेट सामन्यांचा अनुभव आहे. तो सध्या भारत अ संघासोबत दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे आणि तेथे त्यानं ९६, २४ व ० अशी तीन डावांत खेळी केली आहे. रणजी करंडक २०१६-१७च्या पर्वात पांचाळनं १७ डावांत ८७.३३च्या सरासरीनं १३१० धावा केल्या होत्या. त्याच पर्वात त्यानं पंजाबविरुद्ध नाबाद ३१४ धावांची सर्वोत्तम वैयक्तिक खेळी केली होती. गुजरातनं तेव्हा जेतेपदही जिंकले होते. भारताचा कसोटी संघ - विराट कोहली (कर्णधार), प्रियांक पांचाळ, लोकेश राहुल, मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, रिषभ पंत, वृद्धीमान सहा, आर अश्वीन, जयंत यादव, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव, जसप्रीत बुमराह, शार्दूल ठाकूर, मोहम्मद सिराज; राखीव - नवदीप सैनी, सौरभ कुमार, दीपक चहर, अर्झान नगवास्वाला
भारत-दक्षिण आफ्रिका दौऱ्याचे वेळापत्रकपहिली कसोटी - २६ ते ३० डिसेंबर, दुपारी १.३० वाजल्यापासून, सेंच्युरियनदुसरी कसोटी - ३ ते ७ जानेवारी, २०२२, दुपारी १.३० वाजल्यापासून, जोहान्सबर्गतिसरी कसोटी - ११ ते १५ जानेवारी, २०२२, दुपारी २ वाजल्यापासून, केप टाऊन