मुंबई : सलामीवीर लोकेश राहुलला दक्षिण आफ्रिकाविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठीच्या 15 सदस्यीय संघात स्थान मिळालेले नाही. बीसीसीआयनं गुरुवारी जाहीर केलेल्या टीम इंडियात राहुलच्या जागी युवा फलंदाज शुबमन गिलला संधी दिली. राहुलच्या अनुपस्थितीत रोहित शर्मा आणि मयांक अग्रवाल हे कसोटीत सलामीला उतरतील.
राहुलला कसोटी क्रिकेटमध्ये कामगिरीत सातत्य राखता आलेले नाही. वेस्ट इंडिज मालिकेतही त्यानं केवळ 4 डावांत 104 धावाच केल्या. शिवाय मागील 30 कसोटी डावांत त्याला 664 धावा करता आल्या. इंग्लंड दौऱ्यावर केलेली 149 धावांची खेळी ही त्याची या डावांतील सर्वोत्तम खेळी ठरली आहे. राहुलला संघातून वगळताना त्याच्यात प्रचंड प्रतिभा असल्याचे निवड समिती प्रमुख एमएसके प्रसाद यांनी सांगितले. पण, त्याचवेळी त्यांनी संघात कमबॅक करण्यासाठी राहुलला महत्त्वाचा सल्लाही दिला.
ते म्हणाले,''हा निर्णय घेण्यापूर्वी आम्ही राहुलशी संवाद साधला होता. तो प्रचंड प्रतिभा असलेला खेळाडू आहे. मात्र, दुर्दैवानं त्याला कसोटी क्रिकेटमध्ये साजेशी कामगिरी करता आलेली नाही. शिखर धवन आणि मुरली विजय याच्यानंतर पुन्हा दोन्ही सलामीवीर बदलणे योग्य ठरले नसते. कोणीतरी अनुभवी फलंदाज असणे गरजेचे होते. त्यामुळे राहुलला अधिक संधी देण्यात आली. दुर्दैवाने त्याला त्या विश्वासावर खरे उतरता आले नाही.''
पण, प्रसाद यांनी संघात कमबॅक करण्यासाठी एक सल्ला दिला. ते म्हणाले,''व्हीव्हीएस लक्ष्मण यालाही एकदा संघातून डच्चू मिळाला होता. पण, तो खचला नाही. त्यानं स्थानिक क्रिकेटमध्ये खोऱ्यानं धावा केल्या. रणजी क्रिकेटमध्ये त्यानं 1400 धावा करत राष्ट्रीय संघात कमबॅक केले होते.''
भारताचा कसोटी संघ : विराट कोहली, मयांक अग्रवाल, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, रिषभ पंत, वृद्धीमान सहा, आर अश्विन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, शुबमन गिल.
कसोटी मालिकेचे वेळापत्रक
पहिला सामनाः 2 ते 6 ऑक्टोबर - विशाखापट्टणम, वेळ - सकाळी 9.30 वाजल्यापासून
दुसरा सामनाः 10 ते 14 ऑक्टोबर - पुणे, वेळ - सकाळी 9.30 वाजल्यापासून
तिसरा सामनाः 19 ते 23 ऑक्टोबर - रांची, वेळ - सकाळी 9.30 वाजल्यापासून
Web Title: India vs South Africa: KL Rahul told to follow VVS Laxman’s example after Test axe
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.