सेंच्युरियन - भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना सध्या सुरु आहे. दक्षिण आफ्रिकेचा नियमित कर्णधार फाफ डू प्लेसिस दुखापतीमुळे वन-डे आणि टी-20 मालिकेतून माघार घेतली आहे. फाफ डू प्लेसिसनं माघार घेतल्यानंतर दक्षिण आफ्रिकेनं उर्वरित एकदिवसीय सामन्यांसाठी युवा एडेन मार्कराम याच्याकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली आहे. एडेन मार्करामचा हा तिसराच वन-डे सामना आहे. आणि त्याच्याकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. सध्या आमला, डिकॉक, ड्युमीनी आणि मिलरसारखे दिग्गज असतानाही कर्णधारपदाची माळ मार्करामच्या गळ्यात पडली आहे. मार्करामने 22 ऑक्टोबर2017 मध्ये बांगलादेश विरोधात पदार्पण केलं होतं. दक्षिण आफ्रिकेचा महान माजी कर्णधार ग्रॅमी स्मिथ हा 22 वनडे सामने खेळल्यावर दक्षिण आफ्रिकेचा वनडे कर्णधार झाला होता. एडिन मार्करमच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेने 2014 मध्ये 19 वर्षाखालील विश्वचषक जिंकला होता. दक्षिण आफ्रिकेने आजपर्यंतच्या इतिहासात हाच एकमेव विश्वचषक जिंकला आहे.
दक्षिण आफ्रिकेकडून यापूर्वी क्लीव्ह राइस यांनी एकही सामना खेळाडू म्हणून न खेळता पहिल्याच सामन्यात संघाचे नेतृत्व केले होते. परंतु तो दक्षिण आफ्रिकेचा इतिहासातील पहिलाच वनडे सामना होता. त्यामुळे हा खास विक्रम आता 23 वर्षीय एडिन मार्करमच्या नावावर जमा झाला आहे. केप्लर वेस्सेल्स यांनी 3 सामने खेळल्यावर चौथ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचे नेतृत्व केले होते. मार्कराम दक्षिण आफ्रिकेचा दुसरा सर्वात तरुण कर्णधार असून जगातील 11 वा सर्वात तरुण वन-डे कर्णधार आहे. त्याने आफ्रिकाकडून 2 वनडे, 6 कसोटी सामने खेळले असून वनडेत 75 तर कसोटीत 520 धावा केल्या आहेत. एडिन मार्करम दक्षिण आफ्रिकेचा वनडेतील 1991 पासूनचा 13 वा कर्णधार ठरला आहे. डुप्लेसीने आजपर्यंत 13 वनडेत संघाचं नेतृत्व केलं असून त्यात संघाला 11 विजय मिळवून दिले आहे. तो दुखापतग्रस्त झाल्यामुळे मार्करमला प्रभारी कर्णधार करण्यात आले आहे.
दुसऱ्या एखदिवसीय सामन्यात भारतीय कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकली आहे. नाणेफेक जिंकून विराटनं प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. भारत या मालिकेत 1-0 असा आघाडीवर आहे. पहिला एकदिवसीय सामना सहज जिंकल्यामुळे भारतीय संघाचा आत्मविश्वास दुणावला आहे. भारतीय संघ मालिकेत आघाडी घेण्याच्या इराद्याने उद्या मैदानात उतरेल.