India vs South Africa, Test Series: द.आफ्रिके विरुद्धची पहिली कसोटी जिंकून भारतीय संघानं मालिकेची जोरदार सुरुवात केली आहे. भारतीय संघानं सेंच्युरियन कसोटी सामना ११३ धावांनी जिंकला आणि नवा इतिहास रचला. सेंच्युरियनच्या मैदानावर द.आफ्रिकेला कसोटी सामन्यात पराभूत करणारा भारत हा पहिला आशियाई संघ ठरला आहे. पण या सामन्यात एक गोलबोट लागलं. क्रिकेटच्या मैदानात भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याच्याकडून अशोभनीय वर्तन घडलं. पण त्याबाबत सिराजनं तातडीनं माफी देखील मागितली आणि प्रतिस्पर्धी फलंदाजाची विचारपूस केली.
नेमकं काय घडलं?
मोहम्मद सिराज दुसऱ्या डावातील भारताचे ६२ वे षटक टाकत होता. समोर दक्षिण आफ्रिकेचा टेंबा बावुमा फलंदाजी करत होता. सिराजनं टाकलेला चेंडू बावुमा यानं खेळून काढला. चेंडू बावुमाच्या बॅटला लागून सिराजच्या हातात गेला. तो पकडून लगेच फलंदाजाला हुल देण्याच्या नादात सिराजकडून चेंडू वेगानं बावुमाच्या दिशेनं फेकला गेला. यात चेंडू थेट बावुमाच्या पायावर जाऊन आदळला. चेंडू लागल्यानं बावुमा विव्हळताना दिसला. हे सर्व अपघातानाच घडलं पण सिराजनं ज्या वेगानं चेंडू फेकला त्यात मोठी दुखापत होण्याची शक्यता होती. दैव बलवत्तर म्हणून बावुमाला गंभीर दुखापत झाली नाही. सिराजलाही तातडीनं त्याची चूक लक्षात आली आणि त्यानं बावुमाची माफी मागितली. दरम्यान, याप्रकरणामुळे सिराजला सोशल मीडियात ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं. उपचारानंतर बावुमा पुन्हा मैदानात खेळण्यासाठी आला.
Web Title: India vs South Africa Mohammed Siraj fires the ball back at Temba Bavuma batter goes down in pain
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.