नवी दिल्ली - वन-डे मालिकेत आधीच 2-0 ने पिछाडीवर असलेल्या दक्षिण आफ्रिकेला आणखी एक धक्का बसला आहे. दक्षिण आफ्रिकेचा यष्टीरक्षक फलंदाज क्वांटन डिकॉक दुखापतीमुळं वन-डे आणि टी-20 मालिकेतून बाहेर पडला आहे. दुसऱ्या वन-डे सामन्यावेळी त्याच्या मनगटाला दुखापत झाली आहे. कर्णधार फाफ डू प्लेसिस आणि ए. बी. डिव्हिलियर्स आधीच दुखापतीमुळं बाहेर आहेत.
कर्णधार फाफ डू प्लेसिस दुखापतीमुळे बाहेर पडल्यामुळं उर्वरित एकदिवसीय सामन्यांसाठी एडेन मार्कराम याच्याकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. पहिल्या एकदिवसीय सामन्यात डू प्लेसिसच्या बोटाला दुखापत झाली होती. त्याच्या बोटाला फ्रॅक्चर झाल्याचे निष्पन्न झाल्याने तो उर्वरित एकदिवसीय सामने व टी-२० मालिकेतही खेळू शकणार नाही. तर ए. बी. डिव्हिलियर्सला तिसऱ्या कसोटीमध्ये दुखापत झाली होती. तो पहिल्या तीन वनडे सामन्यातून बाहेर पडला आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पुढील सामना सात तारखेला खेळवला जाणार आहे.
दक्षिण आफ्रिका संघाच्या ट्विटर खात्यावरुन ही माहिती देण्यात आली आहे. रविवारी झालेल्या दुसऱ्या वन-डे सामन्यात फलंदाजी करताना डिकॉकला मनगटाला दुखापत झाली होती. या दुखापतीतून सावरण्यासाठी त्याला दोन ते चार अठवड्याचा वेळ लागू शकतो अशी माहिती दक्षिण आफ्रिकेचा मॅनेजर मोहम्म मूसाजी यांनी दिली.
मूसाजी म्हणाले की, अशा जखमा बऱ्या होण्यासाठी दोन ते चार आठवड्याचा कालावधी लागतो. याचा अर्थ असा होतो की, डिकॉक भारताविरोधातील उर्वरीत वन-डे आणि कसोटी सामने खेळू शकणार नाही. दक्षिण आफ्रिकेची मेडिकल टीम त्याच्यावर लक्ष ठेवून आहे. पुढील महिन्यात ऑस्ट्रेलियाविरोधात होणाऱ्या कसोटी मालिकेपूर्वी डिकॉक फिट होईल अशी आशा आहे. डिकॉकच्या जागी दक्षिण आफ्रिकेनं कोणत्याही अतिरिक्त खेळाडूची निवड केली नाही.