India vs South Africa : भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या कसोटी मालिकेला २६ डिसेंबरपासून सुरूवात होणार आहे. दोन्ही संघ या मालिकेसाठी सज्ज झाले आहेत. भारतीय संघ १६ डिसेंबरला मुंबईहून जोहान्सबर्गसाठी रवाना होणार आहे. त्याआधी भारतीय संघ ३ दिवसांसाठी क्वारंटाईन झाला आहे. रोहित शर्माला ( Rohit Sharma) सरावा दरम्यान झालेल्या दुखापतीनं भारतीयांची चिंता वाढलेली असताना दक्षिण आफ्रिकेलाही धक्का देणारी बातमी समोर येत आहे. आफ्रिकेचा सलामीवीर क्विंटन डी कॉक ( Quinton de Kock) हा तिसऱ्या कसोटी सामन्यात खेळणार नसल्याचे वृत्त समोर येत आहे. त्याला कारणही तसेच आहे. क्विंटन डी कॉकची पत्नी साशा ही गर्भवती असून जानेवारीत या जोडीच्या घरी पाळणा हलणार आहे. बायो-बबलमुळे क्विंटन कदाचित दुसऱ्या कसोटीपासूनच हा दौरा सोडू शकतो.
दक्षिण आफ्रिका निवड समितीचे व्हिक्टर मपित्सँग यांनी ESPNcricinfo ला ही माहिती दिली. ते म्हणाले, क्विंटन डी कॉकला तिसऱ्या कसोटीला मुकावे लागेल. त्यामुळे आफ्रिकेला प्रमुख यष्टिरक्षक व तळाच्या क्रमवारीतील फलंदाजाशिवाय खेळावे लागणार आहे. कदाचित त्याला तिसऱ्या कसोटी आधीच बायो बबल सोडावा लागेल. कायले वेरेयने आणि रायन रिकेल्टन हे त्याच्याजागी संघात खेळू शकतील.
वेरेयने यानं जून महिन्यात उप कर्णधार टेंम्बा बवुमा याच्या अनुपस्थितीत वेस्ट इंडिज दौऱ्यावर आफ्रिकेकडून पदार्पण केलं होतं. त्या दौऱ्यावर तीन डावांमध्ये त्यानं ३९ धावा केल्या होत्या. त्यानंतर तो वेस्टर्न प्रोव्हिंसकडून प्रथम श्रेणी क्रिकेट खेळला आणि एक अर्धशतक झळकावलं. रिकेल्टन हा अनकॅप खेळाडू आहे. पण, मागील १० प्रथम श्रेणी सामन्यांत त्यानं दोन शतकं झळकावली आहेत. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत क्विंटन डी कॉकनं ब्लॅक लिव्ह मॅटर मोहिमेसाठी गुडघ्यावर बसण्यास नकार दिला होता आणि तेव्हा त्याला दुसऱ्या सामन्याला मुकावे लागले होते. पण, त्यानंतर त्यानं माफी मागितली आणि त्याचे संघात पुनरागमन झाले.
दक्षिण आफ्रिकेचा कसोटी संघ - डिल एल्गर, टेम्बा बवुमा, क्विंट डी कॉक, कागिसो रबाडा, सारेल एर्वी, बेयूरन हेंड्रीक्स, जॉर्ज लिंडे, केशव महाराज, लुंगी एनगिडी, एडन मार्कराम, वियान मुल्डर, अॅनरिच नॉर्ट्जे, किगन पीटरसन, रॅसी व्हॅन डेर ड्युसेन, कायले वेरेयन, मार्का जान्सेन, ग्लेंटन स्टुर्मन, प्रेनेलान सुब्रायेन, सिसांडा मगाला, रियान रिकेल्टन, ड्युन ऑलिव्हर
भारत-दक्षिण आफ्रिका कसोटी मालिकेचे वेळापत्रक
- पहिली कसोटी - २६ ते ३० डिसेंबर, दुपारी १.३० वाजल्यापासून, सेंच्युरियन
- दुसरी कसोटी - ३ ते ७ जानेवारी, २०२२, दुपारी १.३० वाजल्यापासून, जोहान्सबर्ग
- तिसरी कसोटी - ११ ते १५ जानेवारी, २०२२, दुपारी २ वाजल्यापासून, केप टाऊन