बंगळुरु, भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका : बंगळुरु येथे होणाऱ्या तिसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यावर पावसाचे सावट आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांची निराशा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पण, तसे न झाल्यास पुन्हा एकदा वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला जाण्याची शक्यता नक्की आहे. या सामन्यात हिटमॅन रोहित शर्मा कॅप्टन विराट कोहलीच्या वर्ल्ड रेकॉर्ड मोडण्यासाठी मैदानात उतरणार आहे. हा वर्ल्ड रेकॉर्ड बुधवारपर्यंत रोहितच्याच नावावर होता. आता यात कोण बाजी मारतो, हे सामना सुरू झाल्यावरच कळेल.
भारतीय संघाने मायदेशात ट्वेंटी-20 दक्षिण आफ्रिकेविरुद्धची अपयशी मालिका बुधवारी खंडित केली होती. दुसरा ट्वेंटी-20 सामना भारताने 7 विकेट्स राखून जिंकला आणि 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता. कर्णधार विराट कोहलीनं नाबाद 72 धावांची खेळी करताना विजयात मोठा वाटा उचलला. शिखर धवनने त्याला ( 40) साजेशी साथ दिली. या सामन्यात कॅप्टन कोहलीनं ट्वेंटी-20तील विश्वविक्रम नावावर केला.
कोहलीनं ट्वेंटी-20त सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम नावावर केला. कोहलीच्या नावावर 2441 धावा आहेत, तर 2434 धावांसह रोहित आता दुसऱ्या स्थानी आहे. या विक्रमात न्यूझीलंडचा मार्टिन गुप्तील ( 2283), पाकिस्तानचा शोएब मलिक (2263) आणि न्यूझीलंडचा ब्रेंडन मॅकलम ( 2140) अव्वल पाचमध्ये आहेत. आता हा विक्रम पुन्हा नावावर करण्यासाठी रोहितला संधी आहे. रोहितला आजच्या सामन्यात 7 धावा कराव्या लागणार आहेत.
संभाव्य संघभारत : विराट कोहली ( कर्णधार) , रोहित शर्मा, लोकेश राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, मनिष पांडे, रिषभ पंत, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, कृणाल पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, राहुल चहर, खलील अहमद, दीपक चहर, नवदीन सैनी.
दक्षिण आफ्रिका : क्विंटन डि कॉक (कर्णधार), रॉसी व्हॅन डेर डुसेन, तेंबा बावुमा, ज्युनिअर डाला, ब्योर्न फोर्चुन, बुरान हेंड्रीक्स, रीजा हेंड्रीक्स, डेव्हिड मिलर, एनरिच नोर्जे, अँडिले फेहलुकवायो, ड्वेन प्रिटोरीयस, कागिसो रबाडा, तरबेझ शम्सी, जॅन जान स्मट्स.