Rohit Sharma Shreyas Iyer India vs South Africa T20 Series: IPL 2022 च्या हंगामानंतर टीम इंडिया आता दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पाच टी२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. ९ जूनपासून ही मालिका सुरू होणार आहे. या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली. रोहित शर्मा, विराट कोहलीसारख्या वरिष्ठ खेळाडूंना या मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली. तर लोकेश राहुलला संघाचा कर्णधार करण्यात आले. या मालिकेच्या निमित्ताने टी२० संघात हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल या खेळाडूंचे पुनरागमन झाले. पण विशेष बाब म्हणजे IPL मध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या अर्शदीप सिंग आणि उमरान मलिक यांनाही प्रथमच संघात स्थान मिळाले. या मालिकेत मुंबईकर श्रेयस अय्यर याला एक सुवर्णसंधी चालून आली आहे.
दक्षिण आफ्रिके विरूद्धच्या मालिकेसाठी भारताने अनेक बड्या खेळाडूंना विश्रांती दिली आहे. त्यासोबतच सूर्यकुमार यादव देखील दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. अशा वेळी श्रेयस अय्यरकडे चौथ्या क्रमांकाचा फलंदाज म्हणून पाहिले जात आहे. मधल्या फळीची जबाबदारी त्याच्या खांद्यावर असणार आहे. या मालिकेत श्रेयस अय्यरला एक मोठा विक्रम खुणावतो आहे. टी२० कारकिर्दीत श्रेयस १,००० धावांपासून केवळ १९१ धावा दूर आहे. त्याला या ५ सामन्यांच्या मालिकेत ही कामगिरी करणे नक्कीच शक्य आहे. इतकंच नव्हे तर त्यासोबत आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये हजार धावांचा टप्पा जलदगतीने गाठणाऱ्या भारतीयांच्या यादीत तिसरा क्रमांक पटकावण्याची संधीही त्याच्याकडे आहे.
श्रेयस अय्यरच्या नावावर आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये ३६ सामन्यांमध्ये ३६.७७च्या सरासरीने ८०९ धावा आहेत. १४० च्या स्ट्राईक रेटने त्याने या धावा कुटल्या आहेत. जलदगतीने हजार धावा पूर्ण करणाऱ्या भारतीयांच्या यादीत विराट कोहली अव्वल आहे. त्याने २०१५ साली २९ सामन्यांमध्ये हा टप्पा गाठला होता. तर लोकेश राहुलने २०१९ साली ३२ सामन्यांत हा पराक्रम केला होता. रोहितने मात्र २०१६ मध्ये टप्पा ओलांडला असला तरी त्याला हजार धावा करण्यासाठी ४७ सामने लागले होते. त्यामुळे पुढील पाच सामन्यात १९१ धावा केल्यास श्रेयस अय्यर रोहितचा विक्रम मोडून पुढे जाण्याची संधी आहे.
भारताचा टी२० संघ- लोकेश राहुल (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, इशान किशन, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, रिषभ पंत (उपकर्णधार) दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, वेंकटेश अय्यर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंग आणि उमरान मलिक.