ऑस्ट्रेलियाला वन डे मालिकेत पराभूत केल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा संघ सोमवारी भारतात दाखल झाला. दक्षिण आफ्रिकेनं घरच्या मैदानावर तीन सामन्यांच्या वन डे मालिकेत ऑस्ट्रेलियाला ३-० अशी धुळ चारली. या मालिका विजयानंतर आफ्रिका संघ भारतात तीन वन डे सामन्यांची मालिका खेळणार आहे. गुरुवारपासून सुरू होणाऱ्या मालिकेपूर्वी आफ्रिकेच्या खेळाडूंनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. Corona Virusचा धोका लक्षात घेता आफ्रिकन खेळाडूंनी टीम इंडियाच्या खेळाडूंशी हस्तांदोलन न करण्याचे ठरवले आहे. विशेष म्हणजे मायदेशात झालेल्या मालिकेत आफ्रिकेचे हेच खेळाडू ऑसींशी हस्तांदोलन करताना दिसले होते.
कोरोना विषाणुंमुळे जगभरात आत्तापर्यंत ३६६१ लोकांचा मृत्यू झाला आहे. रविवारी एकाच दिवसात १७५२ जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली, त्यापैकी ८९ लोकांचा मृत्यू झाला आहे. चीनमध्ये जवळपास ८० हजार कोरोनाग्रस्त असल्याचे पुढे आले आहे. त्यापैकी ३००० जणांचा मृत्यू कोरोनामुळेच झाल्याची माहिती आहे. जगभरात १ लाख ०७ हजार ८०३ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. भारतात कोरोनाचे ४३ रुग्ण आढळले. त्यामुळे भारत दौऱ्यावर आलेल्या आफ्रिकेच्या खेळाडूंनी टीम इंडियाच्या खेळाडूंशी हस्तांदोलन न करण्याचे ठरविले आहे. आरोग्याच्या काळजीच्या दृष्टीनं सर्व खेळाडूंसाठी हा सक्तीचा नियम केला असल्याची माहिती, आफ्रिकन संघाचे प्रशिक्षक मार्क बाऊचर यांनी दिली.
भारतीय संघ - शिखर धवन, पृथ्वी शॉ, विराट कोहली, लोकेश राहुल, मनीष पांडे, श्रेयस अय्यर, रिषभ पंत, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, नवदीप सैनी, कुलदीप यादव, शुबमन गिल
दक्षिण आफ्रिका संघ : क्विंटन डी कॉक ( कर्णधार), टेंबा बवुमा, रॅसी व्हॅन डेर ड्यूसेन, फॅफ ड्यू प्लेसिस, कायले व्हेरेयने, हेनरीच क्लासेन, डेव्हिड मिलर, जॉन-जॉन स्मट्स, अँडील फेहलुक्वायो, लुंगी एनगिडी, लूथो सिपाम्ला, बेयूरन हेंड्रीक्स, अॅनरीच नॉर्टजे, जॉर्ज लिंडे, केशव महाराज
वन डे भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका - 12 मार्च, धर्मशालाभारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका - 15 मार्च, लखनौभारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका - 18 मार्च, कोलकाता