India Vs South Africa T20 Series : माजी कर्णधार विराट कोहली याचा फॉर्म सध्या साऱ्यांसाठीच चिंतेचा विषय बनला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याला अडीच वर्षात एकही शतक झळकावता आलेले नाही. त्यात सध्या सुरू असलेल्या इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वात त्याची बॅट जणू रुसली आहे. अशात विराटने दीड-दोन महिने विश्रांती घ्यावी असा सल्ला माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी दिला आहे. पण, RCBचा कर्णधार फॅफ ड्यू प्लेसिस याच्या मते विराटला क्रिकेटपासून दूर करणे चुकीचे ठरेल, तो मग सतत खराब फॉर्माचाच विचार करेल. त्याला संधी मिळायला हवी, असे विधान केले. पण, विराटचा फॉर्म हा त्याच्यासाठीच नव्हे, तर BCCIसाठीही चितेचा विषय बनलाय आणि त्यामुळे ट्वेंटी-२० संघातील त्याचे स्थान धोक्यात आले आहे. BCCI च्या मुख्यालयातून तसे संकेत मिळण्यास सुरूवात झाली आहे.
आयपीएल २०२२नंतर भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पाच सामन्यांच्या ट्वेंटी-२० मालिका खेळणार आहे. यंदाचे वर्ष ट्वेंटी-२० वर्ल्ड कपचे असल्याने बीसीसीआयला अंतिम संघ निवडताना अनेक पर्यायांची चाचपणी करण्याची हीच संधी आहे. त्यामुळे वर्ल्ड कप स्पर्धेपर्यंतच्या ट्वेंटी-२० मालिकेत BCCI अनेक प्रयोग करताना दिसणार आहे. अशात विराटचा फॉर्म पाहता ट्वेंटी-२० संघातील त्याचे स्थान धोक्यात असल्याचे संकेत BCCIच्या अधिकाऱ्याने दिले आहे. InsideSport ने दिलेल्या वृत्तानुसार निवड समिती व BCCI यांना विराटच्या फॉर्माची चिंता आहे.
बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने InsideSportला सांगितले की, भारतीय क्रिकेटमधील त्याचे योगदान हे अतुलनिय आहेस परंतु त्याचा सध्याचा फॉर्म हा बीसीसीआय आणि निवड समिती यांच्यासाठी मोठा चिंतेचा विषय ठरलाय. निवड समितीच्या मुद्यात आम्ही हस्तक्षेप करणार नाही. त्यामुळे विराटला किंवा अन्य खेळाडूला खेळवायचे की नाही, हे निवड समिती ठरवेल. त्याच्यावर आम्ही आमचं मत मांडू शकत नाही. पण, तेही तितकेच चिंतित असतील हे नक्की.
विराट कोहली मधल्या फळीतील प्रमुख फलंदाज आहे. त्यामुळे त्याच्या संघातील स्थानाबद्दल निवड समितीच्या सदस्यांनी थेट बोलणे टाळले.
विराट कोहलीची आयपीएल २०२२मधील कामगिरी
- ४१* वि. पंजाब किंग्स
- १२ वि. कोलकाता नाइट रायडर्स
- ५ वि. राजस्थान रॉयल्स
- ४८ वि. मुंबई इंडियन्स
- १ वि. चेन्नई सुपर किंग्स
- १२ वि. दिल्ली कॅपिटल्स
- ० वि. लखनौ सुपर जायंट्स
- ० वि. सनरायझर्स हैदराबाद
- ९ वि. राजस्थान रॉयल्स