मतीन खानस्पोर्ट्स हेड - सहायक उपाध्यक्षलोकमत पत्रसमूहसध्या सुरू असलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेतील दोन्ही सामने आपण अगदीच सहज गमावले. जिंकणे किंवा हारणे हा खेळाचा भाग असतो, हे जरी मान्य केले तरी भारतीय संघाच्या नियोजनासंदर्भात काही प्रश्न नक्कीच उपस्थित केेले जाऊ शकतात. एखाद्या खेळाडूचा फॉर्म चांगला असला की, त्याला काही काळ विश्रांती देणे हे बऱ्याच कालावधीपासून क्रिकेटमध्ये चालत आलेली बाब आहे. मात्र नवल या गोष्टीचे वाटते की, ‘आऊट ऑफ फॉर्म’ असलेल्या रोहित शर्मा आणि विराट कोहली या खेळाडूंना कोणत्या आधारावर सध्याच्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतून विश्रांती देण्यात आली. कारण फॉर्ममध्ये परत येण्याच्या दृष्टीने या दोन्ही खेळाडूंकडे मायदेशात सुरू असलेली ही मालिका एक सुवर्ण संधी होती.
आगामी टी-२० विश्वचषकाच्या दृष्टीने सध्याच्या भारतीय संघाकडे बघितले तर, या संघात सहा असे खेळाडू आहेत ज्यांना विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियाला नेण्याचा काही प्रश्नच येत नाही. कारण त्या संघात रोहित शर्मा, विराट कोहली, लोकेश राहुल, मोहम्मद शमी, जसप्रीत बूमराह, हार्दिक पांड्या आणि ऋषभ पंत या सर्वांचा सहभाग निश्चित आहे. मग अशावेळी ज्यांचा संघ निवडसाठी विचार होणार नाही अशा खेळाडूंना सध्याच्या मालिकेत खेळवून काय उपयोग. विश्वचषकाआधी सराव व्हावा म्हणून जे संघात हवे होते त्यांना विश्रांती दिली जाणे अनाकलनीयच ठरले.
मला प्रश्न पडतो की, जर खेळाडूंच्या दमण्याचा किंवा थकव्याचा मुद्दा असेल तर मग रोहित आणि विराट आयपीएलमध्ये असे कितीसे खेळले? दोघांनी धावाही फार कमी केल्या. वर दिलेल्या आकडेवारीद्वारे त्यांची कामगिरी आपल्याला जाणून घेता येईल. यंदाच्या संपूर्ण आयपीएल सामन्यांचा विचार केला तर दोघांनी मोजून ४ ते ५ ताससुद्धा फलंदाजी केली नसेल. कारण कसोटीत तर फलंदाजांना पूर्ण दिवस फलंदाजी करावी लागते. चेतेश्वर पुजाराने २०१७ साली ऑस्ट्रेलियाच्या भारत दौऱ्यात रांची कसोटीत तब्बल ६७२ मिनिटे ५२५ चेंडूचा सामना करीत २०२ धावा केल्या होत्या. अशावेळी त्या मालिकेनंतर पुजाराला विश्रांती दिली तर ते आपण समजू शकलो असतो. पण, या ४ ते ५ खेळण्यांचे काय? समजण्यापलीकडच्या या गोष्टी आहेत.
नेहमीच आपण विश्वचषकाच्या आधी संघ निवडीबाबत संभ्रमावस्थेत असतो. कारण नेमक्या कोणत्या खेळाडूंना घेऊन संघ खेळवायचा हे आपल्याला नीट उमगलेले नसते. अखेर त्याचे परिणामही आपल्याला भोगावे लागतात. तुम्हाला आठवत असेल की, कसे २०१९ सालच्या एकदिवसीय विश्वचषकात चौथ्या क्रमांकाच्या फलंदाजीसाठी आपल्या योग्य खेळाडू निवडताना किती संघर्ष करावा लागला होता. या स्थानासाठी सर्वात योग्य खेळाडू असलेल्या अंबाती रायुडूला निवड समितीने वगळून केवळ एका सामन्यात चांगली कामगिरी करणाऱ्या विजय शंकरचा संघात समावेश केला होता. या निवडीचे दुष्परिणामही आपल्याला भोगावे लागले होते. कारण न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात चौथ्या क्रमांकासाठीच्या योग्य खेळाडूची उणीव आपल्याला प्रकर्षाने जाणवली. मला भीती वाटते आहे की, आगामी विश्वचषकातही याची पुनरावृत्ती व्हायला नको.इतना भी गुमान न कर अपने नाम पर ए बेखबरआजकल जीत से ज्यादा तेरी हार के चर्चे हैंसमालोचकांनी हा मुद्दा उपस्थित केलासुनील गावस्कर, रवी शास्त्री आणि आकाश चोपडा यांच्या सारखे भारताचे माजी खेळाडू दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० सामन्यावेळी समालोचन करताना हे अनेकदा बोलेल की, केवळ त्याच खेळाडूंना विश्रांती दिली जाते जे चांगल्या फॉर्ममध्ये असतात. तसेच गेल्या सामन्यातील कामगिरीमुळे ज्यांना थकवा आला असेल त्यांनाच ही संधी दिली जाते. पण रोहित, विराट हे खरेच थकलेले आहेत? कोहलीने तर मधे-मधे काही छोटे ब्रेकसुद्धा घेतलेले आहे.अजब दृष्टिकोननवल या गोष्टीचे आहे की रोहित किंवा विराट या दोघांपैकी कोणीच असे नाही म्हणाले की, फॉर्ममध्ये परतण्यासाठी मला दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका खेळायची आहे. दोन दिग्गज खेळाडूंचा खेळाप्रतिचा दृष्टीचा हा अजबच दृष्टिकोन म्हणावा लागेल. स्वत:हून खेळण्याची उत्सुकता या दोन खेळाडूंनी दाखवली असती तर क्रिकेटप्रेमींना आनंदच झाला असता.
(२०२२ आयपीएल)