संपूर्ण जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. आता भारतातही कोरोना पसरायला सुरुवात झाली आहे. यामुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या एकदिवसीय मालिकेदरम्या भारतीय गोलंदाज चेंडू चमकवण्यासाठी त्यावर लाळ न लावण्याचा निर्णय घेऊ शकतात, अशी माहिती भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार याने दिली आहे.
भुवनेश्वर म्हणाला, मोठ्या प्रमाणावर फैलावणाऱ्या या व्हायरसपासून बचावासाठी हा निर्णय घेतला जाऊ शकतो. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणाऱ्या तीन एक दिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना गुरुवारी धर्मशाळा येथे खेळला जाणार आहे.
आम्ही सध्या चेंडूवर लाळ न लावण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, चेंडू चमकवण्यासाठी आम्ही त्यावर लाळ लावणार की नाही, हे मी अद्याप स्पष्टपणे सांगू शकत नाही. मात्र, चेंडू चमकवला नाही, तर आफ्रिकण फलंदाज आपल्यावर तुटून पडतील आणि आपण म्हणाल, की आम्ही चांगली गोलंदाजी केली नाही, असे भुवनेश्वर म्हणाल.
आज भारतीय संघाची बैठक आहे. या बैठकीत आम्हाला काही निर्देश दिले जातील. त्यानुसार आम्ही योग्य पर्यायावर विचार करू. मात्र, संघाचे डॉक्टर काय सल्ला देतात यावरच सर्व काही अवलंबून आहे, असेही भुवनेश्वरने सांगितले.
स्पोर्ट्स हर्नियाच्या शस्त्रक्रियेनंतर वेगवान गोलंदाज भुवनेश्वरचे भारतीय संघात पुनरागमन झाले आहे. यावेळी त्याने आयपीएल संदर्भात कसल्याही प्रकारचे भाष्य करण्यास नकार दिला. तो म्हणाला, यावेळी आपण काहीही सांगू शकत नाही. कारण आता भारतातही कोरोना पसरायला सुरुवात झाली आहे. मात्र आम्ही शक्य तेवढी सावधगिरी बाळगत आहोत. आमच्यासोबत डॉक्टरांचा एक चमूही आहे आणी ते आम्हाला काय करावे आणि काय करू नये, या संदर्भात मार्गदर्शन करत आहेत.
कोरोना व्हायरसमुळे जगभरात आतापर्यंत जवळपास 4 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे.