भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका : ट्वेंटी-20 मालिका बरोबरीत सुटल्यानंतर दोन्ही संघांनी आता कसोटी मालिकेकडे मोर्चा वळवला आहे. 2 ऑक्टोबरपासून पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे. या मालिकेत सर्वांना उत्सुकता लागली आहे ती रोहित शर्माच्या ओपनिंगची. ट्वेंटी-20 आणि वन डे क्रिकेटमध्ये रोहित हा भारताचा प्रमुख सलामीवीर आहे, परंतु कसोटीत रोहित 5 किंवा 6 व्या क्रमांकावर येतो. मात्र, आता कसोटीतही त्याला ओपनिंगची संधी मिळणार आहे. त्याच्या या संधीबाबत मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्रींनी मोठं विधान केलं आहे.
मर्यादित षटकांच्या सामन्यात रोहितची कामगिरी लक्षात घेऊनच 2013मध्ये त्याला ओपनिंग करण्याची संधी देण्यात आली. पण, कसोटीत त्याच्याकडून तशाच कामगिरीच लगेच अपेक्षा केली जाऊ नये. कसोटीत रोहितला ओपनिंगला पाठवण्याबाबत शास्त्री म्हणाले,''मुंबईसाठी सलामीला खेळायला सुरुवात कर असा सल्ला मी रोहितला 2015-16मध्ये दिला होता. त्याच्याकडे तो X फॅक्टर आहे, परंतु 5 व्या किंवा 6व्या क्रमांकावरून थेट सलामीला खेळणं तितकं सोपं नाही. रोहित या नव्या जबाबदारीत यशस्वी होईल आणि त्यासाठी त्याला पुरेसा वेळ देण्याची आमची तयारी आहे''