- अयाज मेमन, कन्सल्टिंग एडिटर
दक्षिण आफ्रिकेत पहिल्यांदा ऐतिहासिक कसोटी मालिका विजयाची भारताकडे संधी होती. प्रतिस्पर्धी संघ काहीसा दुबळा होता. त्यामुळे त्यांचा व्हाईटवॉश होईल, असे वाटत होते. पण, अव्वल स्थानावरील संघाला धूळ चारून याच संघाने बाजी फिरवली. भारताने जिंकणे अपेक्षित असताना पराभवाची नामुष्की झेलली. या पराभवाची पाच कारणे सांगता येतील...
फलंदाजीत ‘फ्लॉप शो’
लोकेश राहुल आणि ऋषभ पंत यांच्याशिवाय एकानेही द. आफ्रिकेत शतक ठोकले नाही. त्या तुलनेत आफ्रिकेचा कमी अनुभवी फलंदाजी क्रम सातत्यपूर्ण आणि आकर्षक फलंदाजी करीत राहिला. सर्वाधिक धावा काढणारे तिन्ही खेळाडू स्थानिक संघातील आहेत. अग्रवाल, पुजारा आणि रहाणे यांनी मात्र निराश केले. राहुल, पंत आणि कोहली यांनी काही चांगल्या खेळी केल्या मात्र त्यांनाही फाॅर्म टिकविता आला नाही. ऑस्ट्रेलियातील कामगिरीसारखी येथे तळाच्या फलंदाजांनी कामगिरी केली नाही.
गोलंदाज चांगले, मात्र विजयासाठी पुरेसे नव्हते
भारतीय गोलंदाजांनी शंभर टक्के कामगिरी केली. त्यातही पुमराह, शमी आणि उमेश यांनी उत्तम मारा केला. मात्र गोलंदाजीतही आफ्रिकेचे खेळाडू त्यांच्या तुलनेत सरस ठरले. रबाडा, एनगिडी आणि युवा येनसन या तिघांनी भारतीय त्रिकूटाहून अधिक गडी बाद केले. आकडे सांगतात या भारतीय गोलंदाजांनी पहिल्या डावात जवळपास ३० तर दुसऱ्या डावात मालिकेत निम्मे (१६) बळी घेतले. द. आफ्रिकेच्या वेगवान माऱ्याने कठीण समयी चांगला मारा केला, त्यांना उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाचीही साथ लाभली. विशेषत: स्लिपमध्ये. भारत मात्र सर्वच आघाडीवर पराभूत झाला.
लवचीकपणाचा अभाव
स्टार खेळाडूंचा भरणा असलेला भारतीय संघ लवचीकपणा, फोकस, दृढनिश्चय आणि महत्त्वाकांक्षा या बाबतीत द. आफ्रिकेची बरोबरी करू शकला नाही. कागदावर यजमान संघ कमकुवत वाटत होता. एन्रिच नोर्खिया जखमी होता आणि डिकॉकची उणीव होती. डिकॉक पहिल्या कसोटीनंतर अचानक निवृत्त झाला. आपल्या संघाचा ३-० ने सफाया होईल, अशी त्याला भीती वाटत असावी. पण, आफ्रिका संघाने पहिल्या सामन्यानंतर स्वत:ला सावरले.
सदोष संघ निवड
तिन्ही कसोटीत पुजारा आणि रहाणे यांना कायम ठेवणे हे पराभूत मनोवृत्तीचे लक्षण ठरले. त्यांच्याकडे अनुभव असेलही पण उच्च दर्जाचा खेळ काही काळापासून झालेला नाही हे दडपणातून निष्पन्न झाले. कोहलीचे दुसऱ्या सामन्यात स्थान घेणारा हनुमा विहारी शेवटच्या कसोटीत हवा होता. तो उत्कृष्ट फॉर्ममध्ये होता शिवाय त्याचा आत्मविश्वास देखील उंचावलेला होता. पुजारा आणि रहाणे तुलनेत हतबल जाणवत होते. संधी मिळाल्यानंतरही या दोघांनी धावा काढण्यात हाराकिरी केली.
उतावीळ नेतृत्व
विराटने युक्ती योजण्यात चूक केली नाही. गोलंदाजीतील बदल आणि क्षेत्ररक्षण हे गरजेनुसार होते. पण, अखेरच्या सामन्यात त्याचा उतावीळपणा आणि चिंतातुर होण्याच्या अतिरेकामुळे मोक्याच्या क्षणी संधीचा लाभ घेण्यास तो अपयशी ठरला. एल्गरविरुद्ध डीआरएसचा निर्णय विरोधात गेल्यानंतर त्याची प्रतिक्रिया बेशिस्त अशीच होती. तंत्रज्ञान हे निश्चितपणे निर्दोष नाही. हॉकआयने चूक केली असण्याची शक्यता आहे. भारताला याआधी याचा लाभही झाला आहे. कोहलीचा राग हा विजयावरील फोकस हटविणारा ठरला.
Web Title: India vs South Africa Test Series five reasons behind Indias defeat
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.