India vs South Africa Test Series: भारतीय संघानं दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका विजयाची संधी गमावली. भारतीय संघाच्या तुलनेत यजमान संघ कागदावर फार कमकुवत वाटत होता. त्यामुळे हिच ती संधी अशी चर्चा सुरू होती. पहिली कसोटी जिंकल्यानंतर आता इतिहास बदलणार २९ वर्षांत प्रथमच कसोटी मालिका जिंकणार असा आत्मविश्वास निर्माण झाला. पण, जोहान्सबर्ग आणि केपटाऊन कसोटीत यजमानांनी दमदार कमबॅक केला आणि दोन्ही कसोटी जिंकून मालिका २-१ अशी खिशात टाकली. फलंदाजांचे अपयश हे या मालिकेतील भारताच्या पराभवामागचे प्रमुख कारण ठरले. अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा आणि मयांक अग्रवाल या तीन प्रमुख खेळाडूंपेक्षा टीम इंडियाला 'Extras' ( अतिरिक्त) धावांनी सर्वाधिक आधार दिला.
जानेवारी २०२०नंतर भारतानं ९ कसोटी विजय आणि ८ पराभव पत्करले. पण, मागील २० कसोटी सामन्यांत भारताला एकदाही पहिल्या डावात ४००+ धावा करता आलेल्या नाहीत आणि ९ विजय हे गोलंदाजांच्या कामगिरीवर मिळवलेले होते. या मालिकेत फलंदाजांचे अपयश हे पराभवामागचं प्रमुख कारण ठरलं. लोकेश राहुलनं ३७.६६च्या सरासरीनं २२६ धावा केल्या. त्यानंतर रिषभ पंत ( १८६ धावा, ३७.२० सरासरी), मयांक अग्रवाल ( १३५ धावा, २२.५ सरासरी), विराट कोहली ( दोन कसोटी, १६१ धावा, ४०.२५ सरासरी), चेतेश्वर पुजारा ( १२४ धावा व २०.६६ सरासरी) आणि अजिंक्य रहाणे ( १३६ धावा व २२.६६ सरासरी) अशषी कामगिरी राहिली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या मालिकेतील भारताच्या एकूण धावांमधील १३६ धावा या अतिरिक्त होत्या. म्हणजेच पुजारा, रहाणे व अग्रवाल यांच्यापेक्षा अतिरिक्त धावांनी भारताला अधिक साथ दिली.
दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकण्याचे भारताचे स्वप्न याहीवेळेस अपुरे राहिले. दुसऱ्या कसोटीत विराट कोहली जायबंदी झाला अन् त्याच्या अनुपस्थितीचा डाव साधून दक्षिण आफ्रिकेनं मालिका १-१ अशी बरोबरीत आणली. तिसऱ्या कसोटीत विराटचे दमदार पुनरागमन झाले, परंतु अन्य सहकाऱ्यांनी माना टाकल्या. दक्षिण आफ्रिकेनं २१२ धावांचे माफक लक्ष्य पार करून मालिका २-१ अशी खिशात घातली. किगन पीटरसन हा आफ्रिकेच्या विजयाचा नायक ठरला. आफ्रिकेनं ०-१ अशा पिछाडीवरून ही मालिका जिंकली.
भारताच्या पहिल्या डावातील २२३ धावांच्या प्रत्युत्तरात आफ्रिकेनं २१० धावा केल्या. दुसऱ्या डावात रिषभनं ४ बाद ५८ धावांवरून टीम इंडियाचा डाव सावरताना विराटसोहत ९४ धावांची भागीदारी केली. विराट माघारी परतला अन् भारतीय फलंदाजांनी रांग लावली. भारताचा दुसरा डाव १९८ धावांवर गडगडला. त्यात रिषभच्या नाबाद १०० धावा होत्या. त्यानं १३९ चेंडूंत ६ चौकार व ४ षटकारांसह नाबाद १०० धावा केल्या . भारतानं दुसऱ्या डावात १९८ धावा करताना आफ्रिकेसमोर विजयासाठी २१२ धावांचे लक्ष्य ठेवले. आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गर ९६ चेंडूंत ३० धावा केल्या. किगन पीटसरन ११३ चेंडूंत १० चौकारांसह ८२ धावांवर माघारी परतला. व्हॅन डेर ड्युसेन व टेम्बा बवुमा यांनी अर्धशतकी भागीदारी करून दक्षिण आफ्रिकेला ७ विकेट्स राखून विजय मिळवून दिला. वबुमा ३२, तर ड्युसेन ४१ धावांवर नाबाद राहिले.